मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटल्यानंतर अखेर रविवारी (15 डिसेंबर) महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. नागपूरमधील राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात 39 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यात नव्या चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली आहे. तर, दुसरीकडं मागील मंत्रिमंडळातून काहींना वगळण्यात आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धक्कातंत्राचा वापर करत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळातून वगळलंय. मंत्रिपदाची संधी न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज झाल्याचं बघायला मिळतंय. असं असतानाच आता भुजबळ यांना वगळण्यामागाचं मोठं कारण शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत? : यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले, "छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यामागे जातीय राजकारण आहे. भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची साथ सोडली. हे सर्वांसाठी अतिशय दुःखदायक होतं. परंतु, ज्याला त्याला आपल्या कर्माची फळं भेटत असतात", असा टोलादेखील त्यांनी लगावला.
महसूल भेटणार की आमसूल : मंत्रिमंडळ विस्तारावरुन टीका करत संजय राऊत म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये झाला. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं कुठली खाती आहेत? हे त्यांनाच माहित नाही. दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत तर बोंबच आहे. त्यांना महसूल भेटणार की आमसूल ते माहीत नाही. निकाल लागल्यानंतर जवळपास एक महिन्यानं मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, कोणाकडं कोणतं खातं आहे, याविषयी कोणीच सांगत नाही. या प्रश्नांची उत्तरं देवेंद्र फडणवीस एकटेच देणार आहेत."
अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप : "विधानसभा, विधान परिषदेत आमचे ताकदीचे नेते आहेत. काही लोकांचे दोन वर्षांपासून टांगलेले कोट अंगावर चढले. परंतु, त्यांची टाय घट्ट किंवा सैल झाली ती आज विधिमंडळात दिसेल", असा टोलाही त्यांनी नाव न घेता शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांना लगावला. तसंच अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला तयार करण्याऐवजी सहा-सहा महिन्याचा फॉर्म्युला केला असता तर सर्वांना मंत्रिपदं भेटली असती. सत्ता, पद आणि पैसा या मोहासाठी जे आम्हाला सोडून गेलेत. अशा अनेक जणांना मंत्रिमंडळ विस्तारातून वगळण्यात आले," असे म्हणत खासदार राऊतांनी शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली.
हेही वाचा -
- मंत्रिमंडळात अमरावतीची पाटी कोरीच, रवी राणांना पुन्हा मंत्रिपदाची हुलकावणी
- "...त्या मंत्र्याचा पुनर्विचार केला जाईल", मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? वाचा सविस्तर
- संविधानाच्या घेतलेल्या शपथे प्रमाणे आमचं सरकार काम करेल; मंत्रिमंडळ विस्तार होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया