पुणे :उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारतील आणि अशी छुपी रणनीती सुरू असल्याचं आमदार रवी राणा म्हणाले होते. याबाबत शिवसेना - उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. "रवी राणा यांची जे. पी. नड्डा यांच्या जागी नेमणूक करण्यात आलीय का? शिवसेना हा स्वतंत्र पक्ष असून, शिवसेनेला एक मोठी परंपरा आहे. जेव्हा हा पक्ष स्थापन झाला तेव्हा या व्यक्तीचा (रवी राणा) जन्म देखील झाला नव्हता," असा टोला संजय राऊत यांनी रवी राणा यांना लगावला. पुण्यात शिवसेना - उबाठा पक्षाचे शहर तसंच जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
काहींचा स्वबळाचा नारा : "लोकसभा,आणि विधानसभा निवडणुकीनंतर संघटनात्मक बांधणीकडं लक्ष देणं गरजेचं आहे. महापालिका तसंच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्यानं पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसंच ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या माध्यमातून चर्चा देखील करण्यात आली. बैठकीत काही पदाधिकारी यांनी स्वबळाचा नारा दिला, तर काहींनी महाविकास आघाडीसोबत लढलं पाहिजे, असं सांगितलं. पुणे महानगरपालिका आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत," असं म्हणत निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे निर्देश संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना दिले.