मुंबई Maharashtra Assembly Elections 2024 : "विधानसभा निवडणुकीला अवघे 4 महिने उरलेले असताना कधीही निवडणुका घ्या. महाविकास आघाडी राज्यात 175 ते 180 जागा जिंकेल, असा ठाम विश्वास ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. "संविधानाचे खरे मारेकरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत, अशी राऊत यांनी घणाघाती टीका केली.
मिशा काढणारे, संन्यास घेणारे, कुठे गेले? :खासदार संजय राऊत म्हणाले, " आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट ही एक शिष्टाचार भेट आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कुठं भेटायला गेल्या? इंडिया आघाडीचे (इतर राज्यातील) मुख्यमंत्री वर्षावर जाणार नाहीत. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 10 जागा मिळाल्या तर आम्ही मिशा काढू, संन्यास घेऊ असं ते सांगत होते. आमच्या 31 जागा आल्या आहेत. 4 जागा आम्ही थोड्या अंतरानं हरलो. आम्ही किमान 175 ते 180 जागा जिंकू, अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात आहे."
संविधानाचे खरे हत्यारे मोदी-शाह : विधान परिषद निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंगबद्दल बोलताना राऊत म्हणाले, "विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याचं काँग्रेसनंदेखील मान्य केलंय. आम्हालादेखील तो अनुभव आलाय. यासाठी फार मोठ्या रकमा देण्यात आल्यात. दोनशे कोटीचे प्रकल्प मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर करण्यात आलेत. ही एक प्रकारची लाच आहे. तुम्ही 25 जुलैला 'संविधान हत्या दिवस' म्हणून साजरा करण्याचं मोदी आणि शाह यांनी ठरवलंय. मग अशाप्रकारे आमदारांना विकत घेऊन असंवैधानिक सरकार बनवणं कितपत योग्य आहे. हे सरकार बेकायदेशीर आहे. आमदार अपात्र ठरू शकतात, अशा पद्धतीची याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला आहे. त्याच आमदारांना घेऊन पुढल्या सहा वर्षासाठी आमदार निवडून गेले, हे असंवैधानिक आहे. संविधानाचे आणि घटनेचे खरे हत्यारे कोण असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत", असा टोला राऊत यांनी लगावलाय.