ठाणे Rohit Pawar ED Inquiry : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर, शरद पवार गटात राहिलेले आमदार रोहित पवार हे आता ईडीच्या रडारवर आले आहेत. बुधवारी रोहित पवार यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळं कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. ठाण्यातील शरद पवार गटाचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंबईतील ईडी कार्यालया बाहेर आंदोलन आणि अन्न त्याग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या या भूमिकेमुळं बुधवारी ईडी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी कार्यकर्ते एकत्र येऊन आंदोलन करतील असं सांगितलं जातय.
ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवणार: शिवसेने पाठोपाठ, शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील अजित पवार यांनी बंड केलं. तसंच अनेक दिग्गज नेत्यांनी अजित पवार यांचं नेतृत्व स्वीकारत पक्षाला रामराम ठोकला. अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार गटात सामील होणं पसंत केलं आणि मंत्रीपद पदरात पाडून घेतलं. आता मागे राहिलेल्या नेत्यांवर ईडीच्या धाडी पडू लागल्याने अनेकांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना चौकशीसाठी मुंबईतील ईडी कार्यालयात बोलवण्यात आल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
'मी रोहित पवार' अशा देणार घोषणा : भाजपा सरकार सूडबुद्धीनं आपल्या नेत्यांच्या मागे ईडी कारवाई लावत आहे. त्याचा आपण जाहीर निषेध करतो, असा आरोप मुकेश पाटील यांनी केलाय. बुधवारी रोहित पवार ईडी कार्यालयात हजर राहून अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहेत. ते जेवढा वेळ ईडी कार्यालयात राहतील तेवढा वेळ आपण कार्यकर्त्यांसह कार्यालया बाहेर ठिय्या आंदोलन करून अन्नत्याग करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ईडी कार्यालया बाहेर जमून आंदोलन करतील. तसंच रोहित पवार यांचा मुखवटा घालून 'मी रोहित पवार' अशा घोषणा देणार आहेत. तसंच शरद पवार गटातील सर्व प्रमुख नेते या आंदोलनांमध्ये सामील होणार असल्यानं, ईडी कार्यालय बाहेर मोठे आंदोलन पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. शरद पवारही यावेळी ईडी कार्यालयात उपस्थित राहतील असंही बोललं जात आहे.