शिर्डी :विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde In Shirdi) हे सध्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज (25 फेब्रुवारी) शिर्डीत माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी दोन्ही शिवसेनेतील नेत्यांचे कानं टोचले. तसंच विधिमंडळ देशाचं असो किंवा राज्याचं, ते लोकशाहीचं एक पवित्रस्थान आहे. अशा पवित्र ठिकाणावर शितोंडे उडवणं योग्य नसल्याचंही ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले राम शिंदे? : शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) आरोप केले होते. यावरुनच आता दोन्ही शिवसेनांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यासंदर्भात विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "देशाला परंपरा असून जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून देशाला ओळखलं जातं. त्यामुळं लोकप्रतिनिधींनीदेखील देशाचं हित आणि संविधान लक्षात घेवून बोललं पाहिजे. दोन दिवसांपासून दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जुगलबंदी सुरू आहे. ते एकत्रित असल्यानं आपले अनुभव शेअर करत आहेत."