पुणे :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या महासंग्रामाला सुरूवात झाली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. मात्र, असं असलं तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीच्या आधी पुणे जिल्ह्यावर गेली अनेक वर्ष राज्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुणे जिल्हा आता महायुतीकडे गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळं पुणे जिल्हा आता कोणाकडे जाणार हे पाहावं लागेल.
जिल्ह्यात बदलली राजकीय परिस्थिती :पुणे जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघ असून या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजकीय समिकरणं बदलली आहेत. सध्याच्या परिस्थितीत महायुतीकडे 17 मतदारसंघ आहेत. तर महाविकास आघाडीकडे 4 मतदारसंघ आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवारांना मिळालेला प्रतिसाद आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जिल्ह्यातील जनता शरद पवारांच्या मागे उभी राहणार की अजित पवारांच्या मागे उभी राहणार हे पाहावं लागेल. लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हे यांना 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली, तर बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना 5 तर पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराला आघाडी मिळाली. मावळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला देखील 5 विधानसभा मतदार संघात आघाडी मिळाल्यानं जिल्ह्यात अनेक वर्ष पालकमंत्री राहिलेल्या अजित पवार यांच्या पक्षाला पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार की काय अशी परिस्थिती आहे.
कोणत्या कोणत्या पक्षाचे आमदार : पुणे जिल्ह्याबाबत माहिती घेतली, तर जुन्नर विधानसभा मतदार संघात अतुल बेनके (राष्ट्रवादी – अजित पवार), आंबेगाव विधानसभा – दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी – अजित पवार), खेड आळंदी विधानसभा – दिलीप मोहिते (राष्ट्रवादी – अजित पवार), शिरुर विधानसभामध्ये अशोक पवार (राष्ट्रवादी – अजित पवार), दौंड विधानसभा – राहुल कुल (भाजप), इंदापूर विधानसभा – दत्ता भरणे (राष्ट्रवादी – अजित पवार), बारामती विधानसभा – अजित पवार (राष्ट्रवादी), पुरंदर विधानसभा – संजय जगताप (काँग्रेस), भोर विधानसभा – संग्राम थोपटे (काँग्रेस), मावळ विधानसभा – सचिन शेळके (राष्ट्रवादी – अजित पवार), चिंचवड विधानसभा – अश्विनी जगताप (भाजप), पिंपरी विधानसभा – अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी – अजित पवार), भोसरी विधानसभा – महेश लांडगे (भाजपा), वडगावशेरी विधानसभा – सुनिल टिंगरे (राष्ट्रवादी – अजित पवार), शिवाजीनगर विधानसभा – सिद्धार्थ शिरोळे (भाजपा), कोथरुड विधानसभा – चंद्रकांत पाटील (भाजपा), खडकवासला विधानसभा – भीमराव तपकीर (भाजप), पर्वती विधानसभा – माधुरी मिसाळ (भाजपा), हडपसर विधानसभा – चेतन तुपे (राष्ट्रवादी – अजित पवार), पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा – सुनिल कांबळे (भाजपा), कसबा पेठ विधानसभा – रवींद्र धंगेकर (काँग्रेस ) हे आमदार आहेत.