मुंबई Prakash Ambedkar On Third Aghadi :लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जाण्याचा आणि नंतर तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वंचित बहुजन आघाडीला त्यावेळी यश आलं नव्हतं. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहेत.
धनंजय शिंदे यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter) वंचित बहुजन आघाडीनं आता ओबीसी आणि आदिवासी समाजावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यानुसार त्यांनी छगन भुजबळ आणि माकप नेते जेपी गावित यांना सोबत येण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांनी अद्याप त्यांना प्रतिसाद दिलेला नाही. "अन्य संघटना आणि आदिवासी समाजातील नेत्यांशी संपर्क साधून याबाबत लवकरच निर्णय घेण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात येईल." असं वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.
समविचारी पक्षांशी चर्चा करण्यास तयार : दरम्यान, आम आदमी पक्षानेही राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. "राज्यातील सर्वच मतदारसंघात आम्ही पक्षाची ताकद वाढवत आहोत. पण त्याचसोबत 1990 प्रमाणे राज्यात पुन्हा तिसरी आघाडी निर्माण होणार असेल आणि त्यातून काही वेगळी समीकरणं येणार असतील तर, समविचारी पक्षांशी चर्चा करण्यास आम्ही सकारात्मक आहोत,"असं आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी व्यक्त केला. "आम आदमी पक्ष आणि इतर समविचारी पक्ष एकत्र आल्यास महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीची ताकद नक्कीच पाहायला मिळेल," असं धनंजय शिंदे म्हणाले.
छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच :यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले, "राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत. पण ते तिसऱ्या आघाडीत जातील अशी शक्यता नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असून आगामी विधानसभा निवडणूकही पक्षासोबत राहूनच लढणार असल्याची आम्हाला खात्री आहे"
लोकसभा निवडणुकीदरम्यान मराठा आरक्षणाबाबत आम्ही सकारात्मक असल्यानं जरंगे पाटील यांनी आमच्यासोबत यावं, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली होती. आता त्यांनी ओबीसी समाजाला हाक दिली असून ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आपण एकत्र येऊन लढू शकतो. तसेच आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर एकत्र येऊन लढलं पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांना विचारलं ते म्हणाले की, "राज्यात ओबीसी आणि आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहेत. ओबीसींच्या आणि आदिवासींच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या समाजातील आमदारांचं प्रतिनिधित्व दिसणं गरजेचं आहे. आदिवासी समाजातील आमदारांना विधानसभेत पाठवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत." असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा
- पंतप्रधान मोदी जिथं हात लावतात तिथं माती होते; संजय राऊतांचा हल्लाबोल म्हणाले 'महाराजांचा पुतळा पाहून काळजात चर्रर झालं' - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
- हेमंत सोरेन यांना मोठा धक्का; नाराज माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन करणार भाजपा प्रवेश - Champai Soren To Join BJP
- "शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले भक्कमपणे उभे, पण..." महाविकास आघाडीचा महायुतीवर निशाणा - statue of chhatrapati shivaji