प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद नागपूर Prakash Ambedkar On MVA :महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत मिळत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे. राज्यातील सर्व 48 जागांवर आमची तयारी पूर्ण झालेली आहे. त्यामुळं फुटलेल्या पक्षांनी आधी आपली ताकद तपासावी, असं ते म्हणाले आहेत.
शेवटपर्यंत चर्चेत सहभागी होण्याचा आग्रह धरणार : नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. मात्र, त्याबाबतीत आम्ही उपरे आहोत. अगोदर ते त्यांची चर्चा करतात मग आम्हाला बोलवतात. आम्ही शेवटपर्यंत चर्चेत सहभागी होण्याचा आग्रह धरणार आहोत. काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात युद्ध सुरू आहे. ते युद्ध संपलं की आमचा उपरेपणा संपेल असं वाटतं. तसंच त्यांनी आमच्यासाठी कोणत्या जागा ठेवल्यात हेदेखील आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजतं."
कोंबडी सोबत शिजवू आणि मिळून खाऊ : "भाजपानं पक्ष फोडणं आणि नेते विकत घेण्याचा सपाटा लावलाय. त्यातून हे सिद्ध होतंय की भाजपा भीतीपोटी हे सगळं करत आहे. कोंबडी शिजवली तर ती सगळ्यांनी मिळून खावी. कोणी पळवापळवी करु नये. शेवटपर्यंत समान कोंबडी वाटण्यात यावी, याची आम्ही वाट बघू." तसंच आम्ही सगळ्यांची पोलखोल करतोय म्हणून आज भाजपाला सर्वात जास्त भीती वंचितची आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
नागपूरच्या विकास पुरुषानं उत्तर द्यावं :पुढं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, "नागपुरची मेट्रो सुरू होऊन आता 4 वर्षे झालीत. मात्र, उत्पन्नात वाढ नसल्यानं ही मेट्रो नागपूर महापालिकेत समाविष्ट केली जाणार आहे. जर अजून तीन टक्के कर्ज वाढलं तर सीस्टम कोलॅप्स होणार की नाही? याचं उत्तर नागपुरच्या विकास पुरुषानं द्यावं."
हेही वाचा -
- 'निवडणुकीत उभं राहिल्या शिवाय पर्याय नाही'; प्रकाश आंबेडकरांचा जरांगे पाटलांना प्रेमाचा सल्ला
- महाविकास आघाडीत बैठकीचा ताळमेळ नाही, वंचित बहूजन आघाडी अनुपस्थित राहणार
- "भाजपाला केवळ 150 जागा जिंकण्याचा अंदाज म्हणून पक्ष फोडण्याचं काम सुरू; प्रकाश आंबेडकरांची टीका