पुणे: राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. वाढलेल्या मतदानाचा फायदा महायुतीला झाल्याचं दिसून आलं. पण या वाढलेल्या मतदानावर विरोधकांकडून संशय व्यक्त केला जातोय. बॅलेट पेपर आणि ईव्हीएम मशिनमध्ये फरक दिसतोय. मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. 'ईव्हीएम मशीनचे सर्वांसमोर पोस्टमार्टम करा, आमच्या तज्ञांकडून आम्ही आमच्या शंकांचं निरासरन करू', अशी मागणी त्यांनी केलीय.
आमच्या शंकांचं निरासरन करावं : आमदार रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत मतदानाची तफावत तसंच वाढलेलं मतदान आणि पोस्टल बॅलेटवर झालेलं मतदार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. निवडणूक आयोगाने चार दिवस सर्व कॅमेरे आणि सर्व लोकांच्या समोर ईव्हीएम समोर आणून आमच्या शंकांचं निरासरन करावं अशी त्यांनी मागणी केलीय. तसंच आम्ही कुठेही रडीचा डाव खेळत नसून या निवडणुकीत लोकांच्यामध्ये जात असताना, लोकांची सरकारबाबत असलेली नाराजी दिसली. तसंच जनतेचा मिळत असलेला पाठिंबा पाहता आम्हाला कमीत कमी १३० जागा तरी मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, आता जो निकाल लागला आहे तो पाहता कोणीच यावर विश्वास व्यक्त करत नाही. नागरिकांकडून ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली जात असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.