ठाणे Thane Poster War : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर ठाण्यातील चंदनवाडी शिवसेना शाखेत 'गड आला पण सिंह गेला' या आशयाचे बॅनरस लागले आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांनी 2 लाख 17 हजार 11 मतांनी विजय मिळवून ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा दारुण पराभव केला.
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय : ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या निवडणुकीत सत्ता विरुद्ध निष्ठा अशी लढत असल्यानं सर्वांचंच लक्ष ठाण्याकडे होतं. ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी एकही आमदार किंवा नगरसेवक नसतानाही शिवसैनिकांच्या मदतीनं ठाण्यात जोरदार प्रचार केला. प्रचार उत्तमरीत्या पार पडला असूनही निकाल त्यांच्याविरोधात गेला. मतमोजणीच्या फेऱ्यांदरम्यान धनुष्यबाणाचा विजय स्पष्ट होत गेला आणि मशालीची चमक कमी होत गेली. अखेरच्या फेरीत नरेश म्हस्के यांना 7 लाख 34 हजार 231मतं मिळाली तर राजन विचारे यांना केवळ 5 लाख 17 हजार 220 मतं मिळाली. या निवडणुकीत ठाकरे गटाचा ठाण्यातील एकमेव मोठा आधार संपुष्टात आल्याचं स्पष्ट झालं. यानंतर चंदनवाडी शाखेत 'गड आला पण सिंह गेला' बॅनर लावल्यानं ठाणेकरांचं लक्ष वेधलंय, असे पोस्टर्स इतर ठिकाणी ही लावण्यात आले आहेत. ठाणेकरांना हा पराभव मान्य नसून, पुढील निवडणुकीत आम्ही पुन्हा ताकद दाखवू असं ठाकरे गटाचे शहरप्रमुख प्रदीप शिंदे यांनी सांगितलंय.