कोल्हापूर- राजकारणात कोण कोणाचा शत्रू आणि कोण कोणाचा मित्र कधीच नसतो, याचं उत्तम उदाहरण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे. कधीकाळी एकमेकांविरोधात लढलेले दोन कट्टर विरोधक आता एकमेकांच्या गळ्यात गळे घालून निवडणुकीला सामोरं जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात सध्या हे चित्र पाहायला मिळत आहे. कधी काळच्या कट्टर विरोधकांचा आता 'दोस्ताना' रंगला आहे.
कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे कट्टर विरोधक-कोल्हापूरजिल्ह्याच्या राजकारणाचा प्रमुख केंद्र असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ आणि संजय घाटगे यांच्यात विस्तवही जात नव्हता. मुश्रीफ- घाटगे यांनी एकमेका विरोधात पाच विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. 1998 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकदाच संजय घाटगे यांना विजय मिळाला. तर पाच वेळा हसन मुश्रीफ कागल विधानसभेतून विजयी होत आले आहेत. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ही संजय घाटगे- मुश्रीफ यांच्या विरोधात उभे होते. मात्र, गेल्या पाच वर्षात राज्यात आलेल्या महाविकास आघाडी आणि महायुती सरकारमध्ये दोन्ही वेळा मंत्रीपदावर विराजमान झालेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून एकेकाळच्या आपल्या विरोधकाला मदतीचा हात दिला. त्यांना जिल्हा बँकेच्या तज्ञ संचालक पदावरही संधी दिली. त्यामुळे या दोघांमधील "दोस्ताना' अधिक घट्ट झाला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यातील दोस्ती कार्यकर्त्यांना रुचते का? यावर विजयाचं गणित ठरणार आहे.
आवाडे- हळवणकर पारंपरिक विरोधक झाले मित्र-वस्त्रनगरी म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजी मतदारसंघात गेली चार दशक आवाडे कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सुरेश हाळवणकर यांनी आवाडेंचा बालेकिल्ला छेदत विजय संपादन केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात उभे टाकले. या निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी बाजी मारत विजयश्री खेचून आणली. यानंतर राज्यात झालेल्या अभूतपूर्व सत्तांतरानंतर स्वतःच्या ताराराणी पक्षाकडून लढलेले प्रकाश आवाडे भारतीय जनता पक्षात डेरेदाखल झाले. आवाडे यांच्या भाजप प्रवेशामुळे हळवणकर यांची मात्र गोची झाली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सुरेश हळवणकर आणि प्रकाश आवाडे यांनी एकत्र येत राहुल आवाडे यांच्या मागे विधानसभेसाठी ताकद उभी केली आहे. कधीकाळी एकमेकांना आव्हान- प्रतिआव्हान देणाऱ्या या दोन मातब्बर नेत्यांची आता खरी कसोटी लागणार आहे.