मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा जोरदार धडाडू लागल्या आहेत. यामुळं प्रचार अगदी शिगेला पोहोचला आहे. प्रचार रॅलीत, सभेत आणि कार्यक्रमातून सत्ताधारी-विरोधक ऐकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहे. तर टीका करताना अनेक नेत्यांची जीभ घसरताना देखील पाहायला मिळत आहे. परिणामी भाषेचा स्तर कमालीचा खालावला आहे. एकमेकांवर वैयक्तिक टीका करताना शारीरिक व्यंगावर सुद्धा टीका होत आहे. हे चित्र लोकसभा निवडणुकीच्या वेळीही पाहायला मिळालं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख टाळत "भटकती आत्मा" अशी टीका शरद पवार यांच्यावर केली होती. यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही सत्ताधारी-विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप आणि चांगलाचं कलगीतुरा रंगतानाचं चित्र पाहायला मिळतंय. गेल्या 15 दिवसात निवडणूक आणि प्रचारात सत्तेच्या लोभापाई, निवडून येण्याच्या लालसेपोटी आपणच कसे श्रेष्ठ आहोत. हे मतदारांना दाखवण्यासाठी सत्ताधारी-विरोधक ऐकमेकांवर खालच्या भाषेत टीका करताहेत. मागील काही दिवसांपासून कुठल्या नेत्यांनी खालची पातळी गाठली आहे, यावर एक नजर टाकूया.
सदाभाऊ खोत-शरद पवार : भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ जत येथील प्रचार सभेत बाेलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. "शरद पवारांनी साखर कारखाने हाणले, सूतगिरण्या हाणल्या, दूध डेरी हाणल्या तरी सुद्धा एवढं होऊन या वयात ते काम करत आहेत. मला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे, असं शरद पवार म्हणत आहेत. पण मी म्हणतो महाराष्ट्राचा चेहरा बदलणार म्हणजे तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करणार काय?", असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावर टीका केली. यानंतर सदाभाऊ खोत यांचा अनेक राजकीय पक्षांनी निषेध केला. स्वतः अजित पवारांनी सदाभाऊ खोत यांना फोन करून हे अत्यंत चुकीचं आहे. वैयक्तिक पातळीवर टीका करणं योग्य नसल्याचं म्हणत सदाभाऊ खोत यांचे कान टोचले. यांनंतर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास काढला, अशी सारवासारव त्यांनी केली. मात्र सदाभाऊ खोत यांच्या पवारांवरील वक्तव्यामुळं सदाभाऊंना टीकेला सामोरं जावं लागलं.
सुनील राऊत-सुवर्णा करंजे : विक्रोळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुनील राऊत हे विद्यमान आमदार आहेत. इथे शिवसेनेकडून सुवर्णा करंजे या सुनील राऊत यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. "माझ्या विरोधात लढवण्यासाठी विरोधकांना तुल्यबळ उमेदवार मिळत नाही, म्हणून त्यांनी एका महिलेला बळीचा बकरा बनवला आहे. आता त्या बकरीला माझ्या गळ्यात बांधण्यात येत आहे", असं म्हणत सुनील राऊत यांची जीभ घसरली आणि वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली. सुनील राऊत यांच्या टिकेनंतर सत्ताधाऱ्यांनी राऊत बंधूवर हल्लाबोल केला. तसंच सुवर्णा करंजे यांनी निवडणूक आयोगात तक्रार दाखल करत सुनील राऊत यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी केली. सुनील राऊतांना त्यांच्या या वक्तव्यामुळं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.