मुंबई PM Modi In Mumbai Today : देशाच्या पंतप्रधान पदी तिसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी आज (13 जुलै) पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येईल. तसंच मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी असलेल्या गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या कामाचं भूमिपूजन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.
'या' विकासकामांचं करणार लोकार्पण :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास मुंबईत दाखल होतील. सर्वप्रथम गोरेगाव पूर्व येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर इथं ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन करतील. त्यानंतर सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात येईल. 29, 400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायभरणी पंतप्रधान मोदी आज करतील. त्यामध्ये ठाणे बोरवली दुहेरी बोगदा प्रकल्पाची पायाभरणी, गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाचं भूमिपूजन, नवी मुंबईतील गतिशक्ती मल्टी मॉडल कार्गो टर्मिनलच्या कामाची पायाभरणी, कल्याण यार्ड रिमोल्डिंगच्या कामाची पायाभरणी, लोकमान्य टिळक टर्मिनस वरील नवीन प्लॅटफॉर्मचं लोकार्पण, यांचा समावेश आहे. 5,600 कोटी रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचा शुभारंभही पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येईल.