पुणे Lok Sabha Election 2024:लोकसभा निवडणुकीनं देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आता लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची तयारी सुरू झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 'महाविजय संकल्प सभेचं' (Maha Vijay Sankalp Sabha) आयोजन रेसकोर्स मैदान येथे सायंकाळी पाच वाजता करण्यात आलं आहे.
रेसकोर्स मैदानावरील सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर स्टेजवर व्हीव्हीआयपी लोकांसाठींची आसन व्यवस्था, कार्यकर्ते आणि नागरिकांसाठीचीदेखील व्यवस्था देखील पूर्ण झालीय. जवळपास दीड लाख लोक या सभेला येतील असा दावा आयोजकाकडून करण्यात आलेला आहे.
मोदीच्या सभेनं भाजपाला किती फायदा होणार?: पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानात भाजपाला हवा तसा सर्वे आला नाही. त्यामुळं या सभेकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सभेनं भाजपाला किती फायदा होतो हे पाहणं आता महत्त्वाच ठरणार आहे. व्यासपीठावर मनसेचे नेते अमित ठाकरे, रासपाचे महादेव जानकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले अशा मित्र पक्षांच्या नेत्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच लोकसभेच्या चारही उमेदवारांना या ठिकाणी भाषण करण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे. त्यामुळं हे चारही उमेदवार प्रचारसभेत भाषण करणार आहेत.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतली होती सभा: 128 एकर अशा भव्य मैदानावरती सभा आयोजित करण्यात आलेली आहे. दीड लाख नागरिक बसतील एवढी क्षमता या मैदानाची आहे. या अगोदर या मैदानावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सभा घेतली होती. त्यानंतर कुठल्याच राजकीय पक्षांनी येथे सभा घ्यायचं धाडस केलेलं नाही. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी आणि बसण्यासाठी भव्य स्टेज उभा करण्यात आलेला आहे. त्यांच्यासमोर अति महत्त्वाच्या तीन हजार व्यक्तींची असान व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमांमध्ये कुणालाही पाण्याची बाटली आणि बॅग घेऊन जाता येणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सभेकडं महाराष्ट्राचं लक्ष: बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढाई सुरू असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता शरद पवार यांच्यावर पुण्यातून टीका करतात का? काही नवे आरोप शरद पवार यांच्यावर करतात का? पंतप्रधान आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत आहे. गेल्या अनेक सभेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या सभेत पंतप्रधान उद्या काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
हेही वाचा -
- महायुतीत भाजपाकडून शिवसेनेची कोंडी? आमदार मनीषा कायंदेंनी स्पष्टच सांगत विषय संपवला - MANISHA KAYANDE EXCLUSIVE INTERVIEW
- "...तर तुम्हाला बारामतीत दूधच विकावं लागलं असतं"; संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल - Sanjay Raut on Ajit Pawar
- 'डॉ भारती पवार या आम्हाला धमकावतात'; भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षांचे गंभीर आरोप, पदाचाही दिला राजीनामा - Dr Bharati Pawar