नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचारसभेला जोरदार सुरुवात झाली. राज्यात विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांकडून घोषणांचा वर्षाव केला जातोय. तर नांदेडमधील महायुतीच्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
काँग्रेसवर हल्लाबोल : "काँग्रेसनं एकापेक्षा एक घोटाळे केले आहेत. काँग्रेसनं फसवणुकीत स्वतःच रेकॉर्ड मोडला. काँग्रेसच्या लाल पुस्तकावर संविधान लिहिलं आहे, मात्र ते उघडून पाहिल्यानंतर ते कोरे आहे. संविधानाच्या नावावर लाल पुस्तक छापायचं आणि देशात बाबासाहेबांचं नाही तर स्वतःच संविधान चालवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे," असा आरोप नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर नांदेड येथील सभेत केला.
मराठवाड्यातील योजना : "दमनगंगा, वैतरणा, गोदावरी रिव्हर लिंक योजनेमुळं मराठवाड्याला लाभ होईल. मराठवाड्यात 11 सिंचन योजनेला मंजुरी देण्यात आली. या क्षेत्रातील सिंचनाची समस्या दूर करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रेड परियोजना सुरू केली होती. पण महाविकास आघाडीच सरकार आलं आणि त्यांनी या योजनेला रोख लावला. आता महायुतीचं सरकार आहे आम्ही या योजनेला गती दिली. शेतकऱ्यांचं हित हेच आमचं ध्येय असून, महाराष्ट्रात करोडो शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा फायदा मिळाला आहे. नांदेडमध्ये पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर दीड हजार करोड रुपये पाठवले आहेत, " असं म्हणत मोदींनी योजनांचा पाढा वाचला.