मुंबई PM Narendra Modi Rally : लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांतील मतदान पूर्ण झालंय. यानंतर आता तिसऱ्या टप्प्यासाठी सर्वच पक्षांचे नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात आज (सोमवार) आणि उद्या (मंगळवारी) एकूण सहा जाहीर सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर, कराड आणि पुण्यात सभांना संबोधित करणार आहेत. तर उद्या म्हणजेच मंगळवारी ते माळशिरस, धाराशिव आणि लातूर इथं सभांना संबोधित करणार आहेत. एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्राच्या मिशनवर असल्याचं दिसून येतंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांत घेणार सहा सभा : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या दोन दिवसांत राज्यात सहा सभा घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यात ते आज तीन सभा आणि उद्या तीन सभा घेणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आज सोलापूर, कराड आणि पुणे आणि मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये त्यांच्या प्रचार सभा होणार आहेत.
कुठे होणार पंतप्रधानांची सभा : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी दुपारी 1.30 वाजता होम ग्राऊंडवर, तर साताऱ्याचे भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड इथं दुपारी 3:45 वाजता सभा होणार आहे. तर पुण्याची सभा सायंकाळी 5:45 वाजता रेसकोर्स मैदानावर होणार आहे. हडपसरमधील ही सभा पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे, बारामतीतील उमेदवार सुनेत्रा पवार आणि शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी होणार आहे.
मंगळवारीही तीन जाहीर सभा : मंगळवारी 30 एप्रिल रोजी दुपारी 11.45 वाजता माढा येथील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी तर माळशिरस इथे सभा होणार आहे. तर दुपारी 1.30 वाजता महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ धाराशिवमध्ये सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता पंतप्रधान मोदी लातूरमध्ये भाजपाचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित करतील.
हेही वाचा :
- "...हे पाहून बाळासाहेबांना काय वाटलं असेल?", कोल्हापूरच्या सभेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेससह ठाकरे गटावर हल्लाबोल - PM Narendra Modi
- 'राहुल गांधींना वायनाडमध्ये संकट वाटतंय, निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसनं मानली हार'; नांदेडमधून मोदींची टीका - PM Narendra Modi Rally