मुंबई PM Narendra Modi on Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहचला असताना, आता वैयक्तिक पातळीवर देखील ऐकमेकांवर चिखलफेक केली जातेय. आतापर्यंत "नकली शिवसेना" असा उल्लेख मोदींकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केला जात होता. मात्र गुरुवारी प्रचाराच्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांचा उल्लेख "बाळासाहेब ठाकरे यांची नकली संतान" असा केलाय. यामुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. यावर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत असून, या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी : तेलंगणात प्रचार सभेत बोलताना मोदी म्हणाले की, हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जरा आठवा, बाळासाहेबांचे जे नकली संतान आहेत, जे नकली शिवसेना चालवत आहेत त्यांना आणि जे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत (शरद पवार) त्यांना माझा सवाल आहे की, पश्चिम भारतातील लोकं हे अरबी लोकांसारखे दिसतायेत, असं ज्यांनी वक्तव्य केलंय हे त्यांना मान्य आहे का? हा माझा सवाल आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हणताना उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता 'नकली शिवसेनेचे नकली बाळासाहेबांचे संतान' असा उल्लेख केला. यानंतर सत्ताधारी-विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
नकली म्हणणारे बेशुद्ध, बेअक्कल : दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आता उद्या 17 मे रोजी हे मुंबईत येतील. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीस्थळाला भेट देतील आणि व्यासपीठावरती बाळासाहेबांची आठवण काढून ढसाढसा रडतील आणि मला जर नकली म्हणत असाल तर तुम्ही सुद्धा बेशुद्ध, बेअक्कली आणि नकली आहात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलीय. तुम्ही या माझ्या शिवसेनेला नकली म्हणता. बाळासाहेबांच्या सुपुत्राला नकली संतान म्हणता. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून बाळासाहेब ठाकरे या सर्वांनी महाराष्ट्राची सेवा केली आणि आता तुमची साथ सोडली म्हणून तुम्ही आमच्यावर टीका करता. तुम्ही वैयक्तिक माझ्यावर टीका करा, परंतु आई-वडिलांवरील टीका बिल्कुल सहन करणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय.
तुम्हीच औरंगजेबची संतान : दरम्यान, नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हटलंय, यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींचा खरपूस समाचार घेतलाय. बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब हे आम्हाला अत्यंत देवासमान आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे हे आम्हाला एक मांगल्यमूर्ती आहेत. या दोन्ही व्यक्तिमत्त्वांना महाराष्ट्र पुजतोय आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राला तुम्ही नकली म्हणता? ही तुमची हिम्मत? मग तुम्हीच औरंगजेबाची संतान आहात, तुम्ही औरंगजेबाचा वंशज आहात, असा घणाघाती हल्लाबोल संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.
'या' अर्थानं म्हणायचं होतं : पंतप्रधान नरेंद्र मोदींना, नकली शिवसेना आहे आणि नकली शिवसेनेत काम करणारे सगळी नकली माणसं आहेत, नकली शिवसेना चालवत आहेत, या अर्थानं म्हणायचं होतं. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींना बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे नाहीत किंवा बाळासाहेबांचे ते वंशज नाहीत असं म्हणायचं नव्हतं. तर त्यांच्याकडे जी विचारधारा आहे. त्या नकली विचारांची नकली शिवसेना आहे. त्या नकली शिवसेनेला उद्धव ठाकरे चालवत आहेत, म्हणून ते नकली संतान आहे, असं म्हणायचं आहे, असं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना भाजपा प्रवक्ते गणेश हाके यांनी म्हटलंय.
पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा मातीत मिळवली : आतापर्यंत पंतप्रधान नकली शिवसेना असा उल्लेख करत होते. परंतु आता त्यांनी हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नकली संतान म्हणून त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा अपमान केलाय. मोदी हिंदू-मुस्लिम यावर ते बोलायचे, काँग्रेसवर टीका करायचे. त्यांनी दहा वर्षात काय केलं? कोणती विकासकामं केली? हे सांगावं. इथून पुढे त्यांना सत्ता कशासाठी हवी आहे? हे पण मोदींनी सांगावं. फक्त रोज उठून हिंदू-मुस्लिमवरून लोकांच्या मनात नवीन काहीतरी पेरायचं हे चुकीचं आहे, असं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटलंय. जर कुठल्याही एका व्यक्तीला त्याच्या आई-वडिलांविषयी जर बोललं तर स्वाभाविकपणे त्या व्यक्तीला राग येणं हे क्रमप्राप्त आहे. मोदी अशी वैयक्तिकरित्या टीका करुन एक नवीन पायंडा पाडत आहेत. देशाचे पंतप्रधान म्हणून जी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा असते, ती त्यांनी आता मातीत मिळवलीय. वैयक्तिक टीका करून त्यांनी आता त्यांची पात्रता दाखवली आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोदींवर केलीय.
बाळासाहेबांचं कार्य पुढं नेण्यात अपयशी : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार होते. जी त्यांची हिंदुत्वाबद्दल भूमिका होती. ती सर्व उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या घरात नेऊन ठेवली. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ते सत्तेत बसले. बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे नकली शिवसेना आहे. जे बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्वाचे विचार होते. बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी काम केलं. ते कार्य आणि विचार उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दिसत नसल्यामुळं त्या अर्थानं त्यांनी बाळासाहेबांचे उद्धव ठाकरे हे नकली संतान असा उल्लेख केलाय. मोदींना कुठंही उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे सुपुत्र नाहीत असं म्हणायचं नव्हतं. परंतु, बाळासाहेबांचं जे कार्य आहे ते पुढं नेण्यात उद्धव ठाकरे अपयशी ठरलेत. म्हणून त्यांनी बाळासाहेबांचे नकली संतान असं म्हटल्याचं शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते अरुण सावंत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटलंय.
हे अयोग्य आहे : सत्ताधारी-विरोधकांकडून प्रचारात ऐकमेकांची उणीधुणी काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. ऐकमेकांवर टीका केली जातेय. आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'बाळासाहेबांचे नकली संतान' असं उद्धव ठाकरेंना म्हणणं, हे अत्यंत चुकीचं आणि अयोग्य असल्याचं माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय.
हेही वाचा :
- पक्ष विलिन न करता एनडीएत सहभागी व्हावं; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांना ऑफर - Pm Modi Offered To Sharad Pawar