पालघर Defamation Notice To Hitendra Thakur : पालघर लोकसभा मतदारसंघात उद्योजक, डॉक्टर, वकील तसंच अन्य समाज घटकांच्या बैठका घेतल्या. तिथं कुठंही खंडणीचा किंवा पैशाचा मुद्दा उपस्थित झाला नाही. असं असताना एक ज्येष्ठ आमदार शंभर कोटीचा आरोप कोणतेही पुरावे नसताना करत असेल, तर ते चुकीचं आणि दुर्दैवी आहे. आमदार ठाकूर यांना एक रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेदरम्यान डॉ. हेमंत सावरा यांचा पालघर लोकसभा मतदारसंघातील विजय निश्चित असल्याचा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला. तसंच माध्यमांशी बोलताना त्यांनी पालघर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून तेथे तयार झालेलं वातावरण, सभा आणि लोकांचा मिळणारा प्रतिसाद याचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात घसरलेली मतदानाची टक्केवारी लक्षात घेता पालघर लोकसभा मतदारसंघात जास्त मतदान व्हावं, यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. मतदान सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या दीड तासात किमान दोनशे मतदान झालं, तर पुढं मतदानाची टक्केवारी 55-60 टक्केच्या आसपास होऊ शकते, असं निदर्शनास आणून त्यासाठी कार्यकर्त्यांना आपल्या मतदारांना सकाळी सकाळीच बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत कसे येतील हे पाहण्याची जबाबदारी दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पुराव्याशिवाय आरोप, मानहानीचा दावा : " लोकसभा निवडणूक सकारात्मक पद्धतीनं घ्यावी, तिला नकारात्मक वातावरण मिळू नये, असा माझा प्रयत्न होता. त्यासाठी मी कोणावरही एका शब्दानं कोणतीही टीका केली नाही. मात्र, असं असताना माझ्यावर पुराव्यांशिवाय खंडणीचे आरोप का केले गेले? हे मला समजत नाही. आमच्या जिल्हाध्यक्षानं त्यांना तुमच्याकडं काही पुरावे असतील तर ते आणून द्या, असं सांगत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसंच, एका कार्यकर्त्याकडून पाच कोटी रुपयांची अशीच नोटीस पाठवण्यात आली असली तरी, आम्ही मात्र त्यांच्याविरोधात (हितेंद्र ठाकूर) एक रुपयाचा मानहानीचा दावा दाखल करू," असं रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.