सातारा Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय. तिसऱ्या टप्प्यातील मतदान असलेल्या मतदार संघात बड्या नेत्यांच्या सभा होत आहेत. राज्यात ऊन्हाचा पारा वाढत असताना आरोप-प्रत्यारोपाने राजकीय वातावरणही तापलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे.
वक्तव्यावर केली सारवासारव :साताऱ्यातील दहिवडी (ता. माण) येथील जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील पक्ष फोडाफोडीवर सडेतोड मत मांडलं. मात्र, लगेचच त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, "पश्चिम महाराष्ट्रात अमेरिकन संस्कृती आहे. कोण कुणाशी कधी लग्न करतं, कोण कुणाशी कधी घटस्फोट घेतं, कोण कुठल्या पार्टीत येतं आणि कोण कुठल्या पार्टीत जातं, हेच समजत नाही." विद्यमान परिस्थितीबद्दल बोलत असल्याचं नितीन गडकरींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःला सावरले आणि मी महाराष्ट्र सरकारमध्ये होतो, त्यावेळची पण अशीच परिस्थिती होती, असं सांगत आपल्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु, गडकरींचं वक्तव्य हे महाराष्ट्रातील विद्यमान घडामोडींवरच होतं, हे उपस्थितांच्या चांगलंच लक्षात आलंय.