नागपूर Nitin Gadkari News : विकासाचे विकेंद्रीकरण करणं हा ‘अॅडव्हांटेज विदर्भ’चा मुख्य उद्देश आहे. काही प्रमाणात हा उद्देश यशस्वी झालाय. पुढील वर्षी प्रत्येक जिल्ह्याचं स्वतंत्र दालन उभारून तेथील उद्योगांना स्थान देण्यात येईल. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यात विकासाची बुलेट ट्रेन वेगानं धावेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, विदर्भात गुंतवणूकदार यावं, येथील उद्योगाचा विकास व्हावा. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्हावा, या उद्देशानं या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
आपली ताकद आणि कमजोरी लक्षात आली :अॅडव्हांटेज विदर्भामुळे विदर्भाची ताकद आणि कमजोरी लक्षात आली. कमजोरीवर काम करून त्याचं ताकदीमध्ये परिवर्तन करण्याचे प्रयत्न केले जातील, असा विश्वास केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला. पुढील महोत्सव आणखी मोठ्या प्रमाणात आयोजित केला जाईल, असंही नितीन गडकरी म्हणाले. विदर्भात इंडस्ट्रीसाठी इकोसिस्टीम असल्याचं या महोत्सवातून लक्षात आलं. यादरम्यान अनेक सामंजस्य करार झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
रोजगार निर्मितीचे व्यासपीठ ठरेल :यावेळी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "‘अॅडव्हांटेज विदर्भ’ मध्ये चांगल्या चर्चा झाल्या आहेत. उत्पादनं प्रदर्शित झाली आहेत. सुंदर स्टार्टअप बघायला मिळाले. तसंच अनेक सामंजस्य करार झाले. विदर्भाचे औद्योगिकरण व्हावे, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी याकरीता आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव मैलाचा दगड ठरलेला आहे. या महोत्सवामुळं विदर्भाची उद्योग क्षेत्रातील जमेची बाजू बाहेरच्या लोकांना लक्षात आली आहे. पहिल्याच वर्षी झालेल्या या यशस्वी आयोजनामुळे भविष्यात ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ रोजगार निर्मितीचे मोठे व्यासपीठ ठरेल", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.