मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक असून यामध्ये ईव्हीएमची यामध्ये मोठी भूमिका असल्याचं मत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पराभूत उमेदवारांनी शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केलं. पराभूत आमदारांची आज मुंबईत बैठक झाली, या बैठकीत त्यांनी आपलं मत मांडलं. ईव्हीएम विरोधात अनेक उमेदवारांनी तक्रार केल्यानं त्याबाबत कायदेशीर लढा देण्यासाठी वकिलांची समिती नेमण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
पराभवाची कारणं समजून घेण्यासाठी बैठक :या बैठकीला विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत तिकीटावर लढून पराभूत झालेले उमेदवार उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी उमेदवारांना या पराभवानं नाराज होऊन मागे हटायचं नाही, पूर्ण ताकदीनं लढायचा संदेश दिल्याचं सांगण्यात आलं. निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या ते सर्व पुरावे गोळा करण्याच्या सूचना देखील उमेदवारांना या बैठकीत देण्यात आल्या. व्हीव्हीपीएटी तपासणीसाठी गुरुवारपर्यंतची वेळ असल्यानं तपासणी करुन घेण्याचे निर्देश शरद पवारांनी उमेदवारांना दिले.
फक्त 10 उमेदवार विजयी : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथं बैठक झाली. त्यामध्ये राज्यभरातील पक्षाच्या उमेदवारांनी आपापली भूमिका मांडली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमर काळे, खासदार अमोल कोल्हे तसेच बारामतीमधून लढलेले युगेंद्र पवार, शशिकांत शिंदे, राजेंद्र शिंगणे, हर्षवर्धन पाटील, प्रशांत जगताप, राणी लंके, राजे देशमुख, मयुरा काळे, सुधाकर भालेराव, सलील देशमुख, बाळासाहेब पाटील, सुनील भुसारा, मेहबूब शेख , रोहिणी खडसे, फहाद अहमद उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला (शरदचंद्र पवार) मोठा फटका बसला असून पक्षाचे फक्त 10 उमेदवार विजयी झाले आहेत.
आंदोलन करण्याची गरज : "ईव्हीएमबाबत जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या मनात जी शंका आहे ती दूर करण्याची गरज आहे. ईव्हीएम बाबतच्या शंका तपासायला चार दिवस द्या. आमचे तज्ञ ईव्हीएम तपासतील, चिकित्सा करतील व आपला संशय दूर करतील," असं रोहित पवार म्हणाले. सर्व विरोधी पक्षांना एकत्र येऊन आंदोलन करण्याची गरज रोहित पवारांंनी यावेळी व्यक्त केली. "2019 च्या लोकसभेच्या तुलनेत तब्बल 98 लाख व लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत मतदारांमध्ये 74 ते 82 लाख एवढी मोठी वाढ झाली," ही वाढ संशयास्पद असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला.