मुंबई :अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं समाजवादी पक्षातून आलेल्या फहाद अहमद यांना उमेदवारी (Swara Bhasker Husband Fahad Ahmad) दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. "उपऱ्यांना पक्षात आल्यावर लगेच उमेदवारी मिळत असेल तर, आम्ही इतकी वर्षे निष्ठेनं पक्षाचं काम करुन काय फायदा?" असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे प्रदेश सचिव निलेश भोसले पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. "आमच्या इच्छुक उमेदवारांपैकी कुणाचीही पत्नी हिरोईन नसल्यानं आम्हाला उमेदवारी मिळाली नाही," असा टोला भोसले यांनी लगावला. फहाद अहमद यांची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर आहे.
अर्ध्या तासापूर्वी आलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी : "अणुशक्तीनगर भागातील कार्यकर्ते पक्षाच्या कठीण काळात पूर्णपणे पक्षाच्या पाठीशी उभे राहिले. मात्र, जेव्हा उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा समाजवादी पक्षातून अर्ध्या तासापूर्वी आलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. तर पक्षाचा हा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांना आवडलेला नाही. याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे," अशी माहिती निलेश भोसले यांनी दिली.
स्वरा भास्करनं मानले आभार : फहाद अहमद यांच्या राष्ट्रवादी (SP) प्रवेशाबद्दल तसंच उमेदवारी दिल्याबद्दल त्यांची पत्नी अभिनेत्री स्वरा भास्करनं शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अखिलेश यादव आणि अबू आझमी यांचे आभार मानले आहेत.