पुणे Rohit Pawar : अजित पवारांनी शनिवारी सुप्रिया सुळे यांच्यावर भोरमध्ये एमआयडीसी आणण्याचं आश्वासन पूर्ण न केल्यानं जोरदार टीका केली होती. पंधरा वर्षात एमआयडीसीचं काय झालं ते सांगा, असं म्हटलं होतं. त्यावरुन आता रोहित पवारांनी आपले काका अजित पवारांवर जोरदार टीका केलीय. तसंच बारामतीतील एमआयडीसीवरुनही थेट आव्हान दिलंय.
अजित पवारांनी काय केलं ते सांगावं : रोहित पवार म्हणाले, "अजित पवार स्वतः बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तिकडं अजित पवारांनी कुठली कंपनी आणली हे सांगावं मग बाकी तालुक्यातील बोलावं. बारामती एमआयडीसीमधील कंपनी कोणी आणल्या? ते पण अजित पवारांनी सांगावं. महाविकास आघाडी सरकार आल्यावर नेत्यांना पदं मिळाली. नेत्यांनी विकास केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना निधी घेऊन गेले."
भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय : पूनम महाजन यांना मुंबईमधून भाजपानं तिकीट नाकारलं आहे. यामुळं भाजपामध्ये निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याचं रोहित पवार म्हणाले. प्रमोद महाजन नाहीत, आता पूनम महाजन आहेत. भाजपामधील पुढच्या पिढीला तिकीट मिळालं नाही, भाजपा बदलेली आहे. बारामतीमधील भाजपा आमच्यासोबत असल्याचंही रोहित पवार म्हणाले.