मुंबई- विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्व पक्षांना महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहे. दरम्यान, आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयाराम-गयाराम यांना ऊत येण्याची शक्यता आहे. तर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (ठाकरे) गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागलीय. मागील आठवड्यात कोकणातील माजी आमदार राजन साळवींनी शिंदे गटात प्रवेश केलाय. यानंतर मुंबईतील उपविभागप्रमुख, कार्यकर्ते आणि पदाधिकार यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. पक्षाला लागलेल्या गळतीवर आज उद्धव ठाकरेंनी मिश्कील भाष्य केलंय. ते मुबंईतील मातोश्री या निवासस्थानी बोलत होते.
मी धक्कापुरुष झालोय...: सध्या उद्धव ठाकरेंना रोजच नवीन धक्के मिळताहेत. त्यामुळं आता मी धक्कापुरुष झालोय. कोण किती धक्के देतय पाहू यात, जे धक्के द्यायचे आहेत ते द्या, पण यांना एकवेळ असा धक्का देऊ की, पुन्हा हे कधी उठणार नाहीत, असा इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिलाय. एखादा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी नाराजी असते. शिवसैनिक म्हटले की, शिस्त आली पाहिजे. सर्वांनी छावा सिनेमा आवर्जून पाहावा. डोळे उघडून सर्वांनी हा सिनेमा पाहावा. मतदार नोंदणी करा, सभासद नोंदणी वाढवा आणि जी चूक विधानसभा निवडणुकीत झाली ती पुन्हा होऊ द्यायची नाही, मला मुंबईत जास्तीत जास्त वॉर्डात भगवा फडकवताना दिसला पाहिजे, असा आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला.
महापालिका निवडणूक एप्रिल-मे महिन्यात : पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुका एप्रिल किंवा मेमध्ये लागण्याची शक्यता आहे. संघटनात्मक बांधणी केली पाहिजे. शिवसैनिकांनी शाखेनुसार काम केलं पाहिजे. तसेच शाखेनुसार काम करण्यास सुरुवात करा. आपल्याच लोकांनीच लाकडाचा दांडा केला असून, ते आपल्याच शिवसेनेच्या, मराठी माणसाच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न करताहेत. आता ही लढाई आता एकट्याची नाही, आपल्या सर्वांची आहे. त्यामुळं कामाला लागा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिलाय.
हेही वाचा :