मुंबई Sharad Pawar Met CM Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीची अनेक दिवसांपासून चर्चा होती. या भेटीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यानंतर दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
आरक्षणावरुन चर्चा : दरम्यान, सध्या राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरुन संघर्ष पेटलेला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. तर काही दिवसांपूर्वी ओबीसींच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनीही उपोषण केलं होतं. दरम्यान, मागील आठवड्यात मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची सिल्वर ओक इथं अचानक भेट घेतली होती. यावेळी राज्यात आरक्षणावरुन जे वातावरण पेटलं आहे. जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याच्यात आपण मध्यस्थी करुन हा वाद शांत करण्याची विनंती भुजबळांनी शरद पवारांना केली होती. यानंतर आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आरक्षणाच्या विषयावर चर्चा करु असं पवारांनी म्हटलं होतं. यानंतर आज शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मराठा आंदोलकांना तुम्ही काय आश्वासन दिलं होतं? तसंच ओबीसी समाजाला तुम्ही काय आश्वासन दिलं होतं? हे सांगावं अशी मागणी शरद पवारांनी बैठकीत केल्याची माहिती समोर येत आहे.