मुंबई Modi Government :लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर 9 जूनला संध्याकाळी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए सरकारमधील काही मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. या मंत्र्यांमध्ये महाराष्ट्रातील काही खासदारांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे. यात पहिल्या खासदाराचं नाव निश्चित झालं असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश निश्चित झाल्याची माहिती समोर आलीय.
प्रफुल पटेलांचं नाव निश्चित : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल यांच्याच नावावर मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. दिल्लीत राज्यातील एनडीएच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या पार पडलेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं समोर येतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांची मंत्रिपदासाठी निवड करण्यात आली. 9 जूनला राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमात प्रफुल पटेल कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं समोर येतंय. मात्र त्यांना कोणतं खातं मिळणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. यापूर्वीही प्रफुल पटेल यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीए सरकारमध्ये केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
राज्याला वाट्याला कोणते खाते येणार : एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदासाठी प्रत्येक चार खासदारांमागे एक मंत्रिपद हे सूत्र निश्चित झाल्याची माहिती समोर येतेय. यात भाजपा महत्त्वाची मंत्रीपदं स्वत:कडे ठेवू शकते. त्यात अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालय हे खातं भाजपा आपल्याकडं ठेवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं आता महाराष्ट्राच्या वाट्याला कोणते खाते येणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. कृषी, रेल्वे, पंचायत राज या खात्यांपैकी एखादं खातं महाराष्ट्राच्या वाट्याला येत का, हे पाहावं लागेल. महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील एखाद्या खासदाराला मोठी जबाबदारी मिळणार का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.