मुंबई Amol Mitkari On Bajrang Sonawane : भाजपाला लोकसभा निवडणूक निकालात अपेक्षित यश मिळालं नसताना मात्र, बहुमताच्या जोरावर केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन झालं. पक्षाचे नेते, आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावे-प्रतिदावे महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला चक्क खासदार आपल्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटातील खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याबाबतच्या चर्चा सुरु आहेत. अमोल मिटकरी यांनीही बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना फोन केल्याचा दावा केला.
बीडमधील एका बप्पांचा फोन आला : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केलं आणि चर्चेला सुरूवात झाली. ट्विटमध्ये मिटकरी म्हणाले की, "बीडच्या बप्पाचा अजित पवारांना फोन, मोठ्या मनाचा दादा”. यानंतर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर अमोल मिटकरी माध्यमांसमोर आले आणि म्हणाले की, "पूर्ण राज्याला माझ्या ट्विटचा अर्थ समजला आहे. अजित पवार जनतेचे प्रश्न मार्गी लावत असतात. त्याच अनुषंगानं सकाळी बीडमधील एका बप्पांचा फोन आला, दादा मला संकटातून वाचवा, त्या अनुषंगाने आपण ट्विट केलं."
तुतारी गटाने खासदार सांभाळून ठेवावेत : "काम करणारा माणूस म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. तसेच ज्यांनी काल विजय उत्सव साजरा केला, त्यांच्यातील काही नेते अजित पवार यांना गळ घालत आहेत. त्यामुळं तुतारी गटाने खासदार संभाळून ठेवावेत. लवकरच मोठा पिक्चर तुम्हाला दिसेल," असा दावा मिटकरी यांनी केला. "अजित पवार हे राज्याच्या केंद्रस्थानी महत्त्वाची व्यक्ती आहे, हे आता सिद्ध होताना दिसत आहे. एखाद्याच्या साखर कारखान्याच्या मजुरांचा प्रश्न असेल, तो व्यक्ती दुसऱ्या गटाचा खासदार असेल आणि तो अजित पवारांना विनंती करत असेल, तर माझ्या सारख्या राष्ट्रवादीच्या आमदाराला ही भूषणावाह बाब आहे," असं मिटकरी म्हणाले.