मुंबई Lok Sabha Election : राज्यातील लोकसभा निवडणुका पार पडल्या असून महायुतीला जास्तीत जास्त जागा मिळतील. मात्र, आता आमचं लक्ष राज्यातील आगामी विधानसभा असून त्या दृष्टीनं तयारी सुरु करण्यात आलीय. येत्या 27 तारखेला या संदर्भात एक बैठक घेतली जाणार असल्याचंही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलंय. तर शरद पवार यांनी फेरमतदानाची केलेली मागणी हास्यास्पद असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आता विधानसभेचं लक्ष्य : राज्यातील लोकसभा निवडणुका अत्यंत उत्साहात पार पडल्या आहेत. या दरम्यान विरोधकांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आणि आरोप केले आहेत. मात्र, ती विरोधकांची सवयच असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावलाय. दरम्यान आता विधानसभा हेच आपलं लक्ष्य असून लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी पक्षानं तयारी सुरु केलीय. त्यासाठी येत्या 27 तारखेला मुंबईतील गरवारे क्लब इथं सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलावण्यात आलीय. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर बैठका घेण्यात येतील विधानसभा निहाय चर्चा करण्यात येईल असं तटकरे म्हणाले. राज्यात महायुतीला लोकसभेत निश्चितच चांगल्या जागा मिळणार आहेत. मात्र, त्यानंतर आता आमचं लक्ष्य विधानसभा असणार आहे. त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मोठा पक्षप्रवेश होणार : दरम्यान येत्या 27 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात काही प्रमुख नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशानंतर आपला पक्ष अधिक मजबूत होईल, पक्ष मजबूत आहेच मात्र तो आता अधिक मजबूत होईल, असं तटकरे म्हणाले. मात्र, नेमकं कोण पक्षप्रवेश घेणार आहे हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. दरम्यान, बीड जिल्हातील परळी मतदानकेंद्रावरील मतदानामध्ये गैरप्रकार झाल्यामुळं फेरमतदान घ्यावं, ही शरद पवार यांची मागणी हास्यास्पद आहे. जर त्यांना याबाबत आक्षेप होता तर तो त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल करायला हवी होती. आता इतक्या दिवसानंतर याबाबतची मागणी करणं म्हणजे पराभव समोर दिसू लागल्याचं चिन्ह आहे, असंही तटकरे म्हणाले.