मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून, महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. विजयानंतर महायुतीत आता मुख्यमंत्रिपदाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधी सोहळा कधी होणार? कोणत्या पक्षाचे किती मंत्री असतील? मुख्यमंत्र्यांसोबत कोण-कोण शपथ घेणार? किती उपमुख्यमंत्री असतील? अशा अनेक प्रश्नांवर चर्चा सुरू आहे.
पद एक आग्रही तिघे : भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांनी एकत्र येत महायुती स्थापन केली आणि विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक 132, शिवसेनेला 57 तर राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल? याबाबत जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. प्रत्येक आमदार, कार्यकर्त्याला आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं असतं. त्यामुळं महायुतीतील तीनही पक्षाचे नेते हे आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी आग्रही आहेत.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले? : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. महायुतीला मोठं यश मिळालं. महायुतीच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची आज (24 नोव्हेंबर) मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत प्रतिक्रिया दिली. "महायुतीतील तीनही पक्ष एकत्र बसून मुख्यमंत्री कोण होणार? याचा निर्णय घेतील. अजित पवारांचा स्ट्राइक रेट खूप चांगला आहे, तेही मुख्यमंत्री होऊ शकतात," असं विधान छगन भुजबळ यांनी केलं.
गिरीश महाजन काय म्हणाले? : "देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत ही आमची आणि भाजपाच्या सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं सर्वांना वाटत असतं. भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं भाजपाचाच मुख्यमंत्री व्हावा आणि तेही देवेंद्र फडणवीसच व्हावेत, असं आम्हाला वाटतं. शेवटी याचा निर्णय दिल्तीतील आमचे वरिष्ठ नेते घेतील व तो निर्णय आम्हाला मान्य असेल," असं भाजपा नेते गिरीश महाजन म्हणाले.