महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

ठाकरेंच्या आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा; पंकजा मुंडे पोलीस ठाण्यात - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
शिवसेना (उबाठा) आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2024, 9:00 PM IST

नाशिक : नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपामध्ये मोठ्या राडा झाला. मतदारांना स्लीप वाटण्यावरून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला. यात एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. यानंतर भाजपा आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अंबड पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली. त्यामुळं पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.

पैसे वाटले जात असल्याचा आरोप : मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलेल्या सावता नगर परिसरात शिवसेना (उबाठा) आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मतदारांना स्लीप वाटण्यावरून राडा झाला. स्लिपबरोबर पैसे देखील वाटले जात असल्याचा आरोप दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी केलाय. या घटनेनंतर शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार सुधाकर बडगुजर हे देखील पोलीस ठाण्यात दाखल झाले. पण पोलिसांनी त्यांना जाण्याचं आवाहन केलं. या मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान आमदार सीमा हिरे, शिवसेना (उबाठा) पक्षाचे सुधाकर बडगुजर आणि मनसेचे दिनकर पाटील यांच्यात तिरंगी लढत आहे.

शिवसेना (उबाठा) आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने (Source - ETV Bharat Reporter)

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार :या घटनेनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि सीमा हिरे पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. "ही घटना गंभीर आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाला, ही गुंडगिरी चालणार नाही. एक महिला उमेदवार असताना ही घटना घडली त्याचा निषेध करते. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी अशा घटनांकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार. आमची निवडणूक विकासावर सुरू आहे. आमचे संस्कार हे जातीवर निवडणूक लढवणं नाही," असं त्या म्हणाल्या.

असे हल्ले आम्ही खपून घेणार नाही :काल नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे पैसे वाटप करत असल्याच्या आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. भाजपा कार्यकर्त्यांकडून गोकुळ गीते यांच्या वाहनावर हल्ला देखील करण्यात आला. याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी आपली सभा रद्द केली आणि पोलीस आयुक्तालयात दाखल झाल्या. "महायुतीकडून अतिशय गलिच्छ राजकारण सुरू आहे. ही खूप चिंताजनक बाब आहे. यापुढे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या कुठल्याही उमेदवार किंवा पदाधिकारीच्या केसाला जरी धक्का दिला, तर आम्ही खपवून घेणार नाही. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा मी स्वतः मुंबईत गृहमंत्र्यांच्या घराबाहेर आमरण उपोषण करेन," असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला होता.

हेही वाचा

  1. "यूपीएनं दहशतवादी कसाबला बिर्याणी दिली पण आम्ही..."; ठाण्यातील सभेतून जेपी नड्डांचा काँग्रेसवर घणाघात
  2. शरद पवारांचं पावसात भाषण; विनोद तावडे म्हणाले, "वातावरण पाहून सभेचं आयोजन"
  3. मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, आता राज ठाकरे म्हणतात...

ABOUT THE AUTHOR

...view details