नाशिक : नाशिक जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ भाजपाचे आमदार सर्वाधिक असून यंदाच्या निवडणुकीत मतदार कोणाला कौल देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
मतदारराजा कोणाला कौल देणार? :राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीनं राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. याला नाशिक जिल्हा देखील अपवाद नाही. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाचे सहा, भाजपाचे पाच, शिवसेनेचे दोन, काँग्रेस एक आणि एमआयएम एक अशी परिस्थिती आहे. मात्र, जागा वाटपात कोणाला किती जागा जाणार यावर त्यांचं राजकीय प्राबल्य ठरणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षात महायुती आणि महाविकास आघाडी निर्माण झाल्यानं इच्छुकांची संख्या देखील वाढली आहे. जवळपास प्रत्येक मतदारसंघात दहापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार आहेत. त्यामध्ये माजी आमदार पासून सामाजिक क्षेत्र, शिक्षण, सहकार, उद्योजक, वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यामुळं जागा वाटपाच्या सूत्रात जिल्ह्यातील कोणती जागा कुणाला सुटणार आणि मतदारराजा कुणाला कौल देणार हे काही दिवसातच समजणार आहे.
मालेगाव बाह्य : शिंदे गटाचे नेते पालकमंत्री दादा भुसे आणि उद्धव सेनेचे अद्वैत हिरे यांच्यात या मतदारसंघात सरळ लढत होण्याची शक्यता आहे. आता बंडू काका बच्छाव यांनीही विधानसभा लढण्यासाठी तयारी केली असून येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
मालेगाव मध्य: एमआयएमचे आमदार मुक्ती मोहम्मद इस्माईल आणि अपक्ष असिफ शेख यांच्यात इथे लढतीची शक्यता आहे. याशिवाय समाजवादीकडून शान-ए-हिंद निहाल अहमद यांना उमेदवारी जाहीरच केली आहे.
दिंडोरी: दिंडोरीतून अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांना चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांच्याकडून आव्हान मिळणार असल्याची शक्यता आहे. गोकुळ झिरवाळ हे शरद पवार गटाकडून रिंगणात उतरू शकतात. तसंच शिंदे गटाचे धनराज महाले यांना पक्षानं शब्द दिल्यानं येथे पेच निर्माण होऊ शकतो.
नांदगाव : शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात महायुतीकडूनच समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केलीय. तर उद्धव सेनेकडून गणेश धात्रक आणि शरद पवार गटाचे महेंद्र बोरसे हे देखील उमेदवारीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे.
बागलाण : भाजपाचे आमदार दिलीप बोरसे यांच्या मतदार संघात लोकसभेत पराभूत झालेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार या दावेदार आहेत. तर गीतांजली पवार, दीपिका चव्हाण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत.
येवला :अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी मिळू शकते. शिवाय संभाजी पवार, अमृता पवार, कुणाल दराडे, सानिया होळकर हे देखील तयारीत आहेत.
निफाड: अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर आणि उद्धव सेनेचे अनिल कदम अशी पारंपरिक लढत निश्चित आहे. अशात लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे भास्कर भगरे निवडून आलेत. त्यामुळं शरद पवार गटानं या मतदारसंघावर दावा केल्यास समीकरण बदलू शकेल अशी परिस्थिती आहे.
इगतपुरी: काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी काही दिवसापूर्वीच पक्षांतर केल्यानं उद्धव सेनेच्या निर्मला गावित विरुद्ध खोसकर लढतीची शक्यता आहे. मात्र ही जागा काँग्रेसला सुटणार की उद्धवसेनेला यावर लढत अवलंबून आहे.
सिन्नर : माजी आमदार राजाभाऊ वाजे खासदार झाल्यानं सिन्नर मतदारसंघाचं राजकीय समीकरण बदललं आहे. अशात अजित पवार गटाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे विरुद्ध ठाकरे गटाचे उद्धव सांगळे अशी सरळ लढत होणार हे जवळपास निश्चित आहे. सांगळे हे आघाडीकडून लढतात की, अपक्ष यावर पुढील समीकरण अवलंबून असणार आहे.