मुंबई MVA Protest Mumbai :महाविकास आघाडीनं मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढत सरकारचा निषेध केला. या आंदोलनाला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, शेवटच्या क्षणी आंदोलनाला परवानगी दिली. या मोर्चात महाविकास आघाडीनं मोठे शक्ती प्रदर्शन दाखवले. आंदोलनाचा समारोप गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला.
महाविकास आघाडीचे नेते सहभागी :महाविकास आघाडीच्या आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना सरकारवर घणाघाती टीका केली. "या सरकारला आता गेट आउट म्हणण्याची वेळ आली आहे," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी सरकारवर केला. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील आमदार, खासदार, नेते, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले.
मोदी कुणा-कुणाची माफी मागणार? :उद्धव ठाकरे म्हणाले, " आम्ही या शिवद्रोही सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलो आहोत. सध्या जे सुरू आहे, त्याला मी राजकारण मानायला तयार नाही. महाराजांचा पुतळा पडल्याचे आम्ही राजकारण करत असल्याचं सत्ताधारी म्हणत आहेत. पण ते राजकारण नाही, गजकर्ण करत आहेत. बाळासाहेब म्हणायचे की, राजकारण हे गजकर्ण आहे. खाजवू दे त्यांना. पण या चुकीला माफी नाही. जनता तुम्हाला माफ करणार नाही. जनतेच्या मनात संताप आहे."
ठाकरेंचा मोदींवर निशाणा : "मोदी तुम्ही माफी कुणा कुणाची मागणार आहात? ज्यांनी पुतळा बनवला आणि ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांची माफी मागणार? संसद भवनाची मागणार? कुणा कुणाची माफी मागणार? हा महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे. शिवरायांचा अपमान आहे. आम्ही गेट ऑफ इंडियावर जमलो आहोत. आता या घटनाबाह्य सरकारला गेट आउट इंडिया म्हणण्याची वेळ आली आहे. पंतप्रधानांनी माफी मागितली. पण त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. पण महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं माफी मागितली आहे. आता बस्स झालंय. तुम्हाला निवडून देऊन महाराष्ट्राची चूक झाली," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केला.