मुंबई : राज्यात नुकत्याचं झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी ईव्हीएम विरोधात आवाज उठवला आहे. अश्यातच पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रशांत जगताप, अणुशक्ती नगर मतदारसंघातील फहाद अहमद आणि मुंबईतील चांदिवली मतदारसंघातील कॉंग्रेसचे आरिफ नसीम खान या पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम तपासणी व पडताळणीसाठी पैसे भरले आहेत.
लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई :याबाबत प्रशांत जगताप म्हणाले, "निवडणूक आयोगाच्या अधिकारानुसार, हडपसर मतदारसंघातील ईव्हीएम मशीनमधील छेडछाड तसंच टेक्नॉलॉजीद्वारे केलेले बदल समोर येत आहे. पाच टक्के मशीन पाहण्याचा अधिकार उमेदवाराला असतो. काल अधिकृत रित्या ईव्हीएम तपासणी व पडताळणीसाठी 12 लाख 74 हजार रुपये भरले. तसंच व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनमधील आकडा समान आहे का? हे पाहणार. लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई असून ही लढाई कायदेशीर तसंच रस्त्यावर येऊन आम्ही लढणार आहोत. ईव्हीएममध्ये झालेला गैरप्रकार समोर आणणार."
निसटत्या मतांनी पराभव : मुंबईतील चांदिवली मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे आरिफ नसीम खान उमेदवार होते. तर त्यांच्याविरोधात असलेले शिवसेनेचे दिलीप लांडे यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. खान यांचा 20 हजार 625 मतांनी पराभव झाला. खान हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळं त्यांना या निवडणुकीत आपला विजय होईल, असा विश्वास होता. मात्र 20 हजार 625 मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यामुळं त्यांनी ईव्हीएम चेकिंग व व्हेरिफिकेशनसाठी तब्बल साडे नऊ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे.