मुंबई EVM Hacking Case :वनराई पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 4 जूनला मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय दंड संविधान कलम १८८ आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम कलम 128 (2) सह 54 निवडणूक नियमांचे नियम अंतर्गत गुन्हा दाखल (MLA Vilas Potnis FIR) करण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा वनराई पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार रविंद्र वायकर यांच्या प्रतिनिधीनं निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
ठाकरे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल :रविंद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर आणि पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनचा वापर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वनराई पोलिसांनी दोघांना देखील 41 अन्वये नोटीस पाठवून चौकशीसाठी समन्स जारी केले आहेत. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. वायकर यांच्या मेहुण्या पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं राजकारण तापण्याची शक्यता आहे.