मुंबई Sanjay Raut On Lakhpati Didi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावरून शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं जनतेसाठी पैसा नसून, केवळ गैरमार्गानं सत्ता स्थापन करण्यासाठी भरपूर काळा पैसा असल्याचंही ते म्हणाले.
सरकारच्या योजनांवर टीका : पंतप्रधान नरेंद्र मोदी लखपती दीदी या योजनेसाठी जळगावात आले. या दौऱयावर संजय राऊतांनी हल्लाबोल केला. "या देशात लाखो तरुण बेरोजगार आहेत. त्यांनाही लखपती करण्याची गरज आहे. महिलांना पैसे दिले जात आहेत व मुख्यमंत्री विचारत आहेत पैसे मिळाले ना? पैसे मिळाले ना? ही काही मुख्यमंत्र्यांची बोलण्याची पद्धत झाली का? मुख्यमंत्री जनतेला हे विचारत असताना, एका महिलेने आवाज दिला, सरकारच्या बापाचे पैसे आहेत का? हे जनतेचे पैसे आहेत," असं म्हणत संजय राऊतांनी लखपती दीदी, लाडकी बहीण योजनेवरुन सरकारला सुनावलं.
पंतप्रधानांनी एक शब्दसुद्धा काढला नाही : "महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेबाबत आंदोलन सुरू आहे. मात्र, या प्रकरणावर पंतप्रधानांनी एक शब्दसुद्धा काढला नाही. जळगावमध्ये मागच्या १५ दिवसात चार लहान मुलींवर अत्याचार झाले. त्यामध्ये एक दिव्यांग आहे. हे कोणीतरी जाऊन पंतप्रधानांना सांगा. तुम्ही कुठल्या दीदींना लखपती बनवायला निघाला आहात? अगोदर त्या महिलांना सुरक्षा द्या. पंतप्रधान येतील, दौरे करत राहतील व आमच्या महिला न्यायासाठी फिरत राहतील," असं म्हणत राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला.
२७ तारखेपासून उर्वरित महाराष्ट्रावर चर्चा : "आमच्या महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही पदाला घेऊन काहीही मतभेद नाहीत. शनिवारी मुंबईत जागा वाटपासंदर्भात पहिली बैठक झाली. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. दिल्लीतील कटकारस्थान पाहता मुंबईत सत्ता असणं फार महत्त्वाचं आहे. मुंबईतील ९९ टक्के विधानसभा जागांवर आमची सहमती झाली. लवकरच जागासुद्धा घोषित करू. सर्वकाही व्यवस्थित होईल. आता २७ तारखेपासून उर्वरित महाराष्ट्र संदर्भात चर्चा होईल," असं संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट नाही : दहीहंडी जवळ आली आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, "शिंदे गट हंडी फोडता फोडता शेवटच्या थराला त्यांना जाता येणार नाही. म्हणून ते वरती लटकणार आहेत. त्यांचा थर कोसळायला सुरुवात झाली." "राज ठाकरे यांची भूमिका ही नेहमी महाराष्ट्राबाबत जे कटकारस्थान करतात त्यांच्यासोबत राहिली. ते कुणासोबत आहेत, त्यांची दिशा स्पष्ट नाही. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला फोडलं त्या शिंदेंसोबत ते आहेत. महाराष्ट्राचे शत्रू असलेल्या मोदी - शाहांसोबत ते आहेत," असं म्हणत राऊतांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
सरकारकडं काळा पैसा :"राज्य सरकारकडं जनतेसाठी, राज्याच्या विकासासाठी, पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी, महिलांना सुरक्षा देण्यासाठी पैसे नाहीत. माणसं विकत घेण्यासाठी, राजकीय उधळपट्टी करण्यासाठी, आमदार, खासदार खरेदी करण्यासाठी, सुपार्या देण्यासाठी यांच्याकडं पैसे आहेत. पण तो काळा पैसा आहे," असा टोला संजय राऊतांनी राज्य आणि केंद्र सरकारला लगावला.
हेही वाचा -
- पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱयावर; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित, खडसे म्हणाले.... - PM Narendra Modi Visit Jalgaon
- आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; कोर्टाला देखील लेकीबाळी आहेत हे लक्षात घ्या, संजय राऊत यांची न्यायालयावर आगपाखड - Sanjay Raut On MVA Protest
- जनतेचा सरकारवर विश्वास नाही, म्हणून बदलापुरात जनतेचा आक्रोश आणि उद्रेक - संजय राऊत - Sanjay Raut on Badlapur