मुंबई Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (13 एप्रिल) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. तसंच महायुतीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, उद्धव ठाकरेंबाबत प्रश्न विचारताच त्यांनी पत्रकार परिषद संपवली.
मोदींमुळंच राम मंदिर झालं : मी भूमिका बदललेली नाही. गेल्या पाच वर्षात परिस्थिती बदललेली आहे. मोदी नसते तर राम मंदिर उभे राहिले नसतं. राम मंदिर, 370 कलम, एनआरसी असे अनेक चांगले विषय मार्गी लागले आहेत. तसंच मोदींमुळंच राम मंदिर उभं राहिलं. त्यामुळं पुन्हा त्यांना एकदा संधी देणं महत्त्वाचं वाटलं. त्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा दिला. मराठी भाषेला अभिजात दर्जा, गड-किल्ल्यांचं संवर्धन असे महाराष्ट्रातील अनेक विषय मोदींकडे मांडणार आहोत, अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उद्धव ठाकरेंना टोला : मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, "गुढीपाडवा मेळाव्यात आपण सांगितलं की, नरेंद्र मोदी यांना आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे. याबाबतचे सर्व विश्लेषण त्या सभेत केलाय. पहिल्या पाच वर्षात ज्या गोष्टी मला पटल्या नाही, त्याबाबत मी विरोध देखील केला." तसंच अनेक वेळा लोक सांगताय राज ठाकरेंनी भूमिका बदलली, 2014 च्या अगोदरची भूमिका निवडून सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते, तर मला भूमिका बदलणं आवश्यक होतं. त्याला भूमिका बदलला म्हणत नाही, तर धोरणावर टीका म्हणतात. त्यावेळी त्याप्रमाणे टीका मी केली होती. अर्थात टीका करताना त्या मोबदल्यात मी काही मागितलं नव्हतं की मला मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून मी टीका करतोय. माझे 40 आमदार फोडले म्हणून मी टीका करतोय, अशा कुठल्याही गोष्टींमधून ती टीका नव्हती, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावलाय. सदरची टीका ही मुद्द्यांवर होती असंही राज ठाकरे म्हणाले.