पुणे Pune Hit And Run Case : रविवारी मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी पैसे घेऊन प्रकरण हाताळलं आहे. यामुळे तपास अधिकाऱ्यांना निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसंच पोलीस आयुक्तांची बदली करावी अशी, मागणी पुणे लोकसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी रेटून धरली आहे. एकटेच आंदोन करत त्यांनी या प्रकरणकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
प्रकरण फास्टट्रॅक कोर्टानं हाताळावं: मागील काही दिवसांपासून पुण्यातील कसबा पेठेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हिट अँड रन प्रकरण उचलून धरलं आहे. ठिय्या आंदोलनादरम्यान ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मी शहरातील अंमली पदार्थ तसंच पब संस्कृती याविषयी बोलतोय. हे सरकार गुन्हेगारांच्या बरोबर असून हिट अँड रन प्रकरण हाताळताना पोलिसांनी अनेक चुका केल्या आहेत. या प्रकरणाच्या दोन एफआयआर दाखल करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. पोलीस स्टेशनमध्ये करोडो रुपयांचा व्यवहार केला जाणे ही बाब खात्याला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावं, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.