नवनीत राणांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया अमरावती Bachhu Kadu On Navneet Rana : अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळणार यावरुन वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा भाजपामध्ये प्रवेश करुन कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचं बघायला मिळतंय. याबाबत नवनीत राणा यांनी देखील सूचक वक्तव्य करत आपल्या भाजपा प्रवेशाबाबत संकेत दिले आहे. यावरच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना बच्चू कडू म्हणाले की, "नवनीत राणा भाजपामध्ये गेल्यासारखंच आहे. कारण, केवळ झेंडा टाकला म्हणजे भाजपामध्ये गेले असं होत नाही. त्यांचं अंतर्मनच भाजपात आहे. पहिल्यांदा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडून आल्या होत्या. त्यावेळी त्या हातात निळा, हिरवा आणि भगवा असे झेंडे घेऊन लढल्या. मात्र, आता त्या हिंदू शेरनी झाल्या आहेत."
भाजपा युवा स्वाभिमान पक्ष संपवणार : पुढं ते म्हणाले की, "भाजपाला लहान पक्ष संपवायचे असून खासदार नवनीत आणि आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष ते संपवणार आहेत. यासर्व गोष्टींची काळजी त्या पक्षातील लोकांनी घेणं गरजेचं आहे", असा सल्ला देखील यावेळी बच्चू कडू यांनी दिला. तसंच आमचा पक्ष संपवण्याची ताकद कुणातही नाही, त्यांच्याजवळ संख्या आहे, तर आमच्याकडं कॉलिटी आहे. त्यामुळं सर्व लढाई ही संख्याबळावर जिंकली जात नाही तर गुणवत्तेच्या बळावर जिंकली जात असल्याचंही ते म्हणाले.
जागावाटपावरुन व्यक्त केली नाराजी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. मात्र, असं असतानाच महायुतीमध्ये जागावाटपावरून अद्यापही मनोमीलन झाल्याचं दिसत नाहीये. महायुतीतील सर्वच नेते जाहिरपणे आपल्या उमेदवारीचा दावा करत आहेत. याविषयी बोलत असताना प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी महायुतीवर टीका करत इशारा दिलाय. ते म्हणाले की, "मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या लहान पक्षांसोबत चर्चा करावी. त्यांनी जागा वाटपासंदर्भात काय निर्णय होतो हे आम्हाला सांगावं अन्यथा आम्ही आमचा स्वतंत्र्य निर्णय घेऊ. तसंच आम्हाला कुणाचंही बंधन नाही."
हेही वाचा -
- अमरावती लोकसभेवरून राणा विरुद्ध अडसूळ; रवी राणा म्हणाले "अडसूळांना अयोध्येत..."
- भाजपात प्रवेश करणार का ? खासदार नवनीत राणांनी स्पष्टचं सांगितलं; 'उद्या जेपी नड्डांच्या उपस्थितीत करणार शक्ती प्रदर्शन'
- 'सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवणीत राणा लोकसभा निवडणुकीत दिसणार नाहीत'