मुंबई Devendra Fadnavis on Reservation : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडी आणि महायुती सरकार यामध्ये जुंपली आहे. आरक्षणावरून राज्यात वातावारण तापले असताना राज्य सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक आयोजित करण्यात आली. मात्र या बैठकीवर महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरन निशाणा साधला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " महाराष्ट्रात जातीय सलोखा निर्माण झाला पाहिजे. महाराष्ट्र शांतता राहून प्रश्न सुटावा हा बैठकीचा हेतू होता. विरोधकांना केवळ निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यासाठी कोणताच समाज महत्वाचा नाही." "विरोधक या बैठकीला येण्याऐवजी विजय वड्डेटीवार यांच्याकडे बसून बैठक करत आहेत," असं ते म्हणाले. या बैठकीत उपस्थित असलेले प्रकाश आंबेडकर यांनी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका लेखी मांडावी, अशी सूचना केली. "या सूचनेवर मुख्यमंत्री योग्य प्रकारे निर्णय घेतील," असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
विरोधकांनी चर्चेपासून काढला पळ : राज्यात मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरुन घमासान चालू आहे. राज्यातील राजकीय वातावरण दोन्ही समाजाच्या आंदोलनामुळं घुसळून निघालं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी सह्याद्री राज्य अतिथीगृहात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. मात्र विरोधी पक्षांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना निमंत्रण देणात आलं होतं. सोमवारी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीची माहिती देताना मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, "विरोधकांनी शेवटच्या क्षणी बैठकीतून आणि चर्चेतून पळ काढला. सरकार चर्चेसाठी बैठक आयोजित करत आहे. विरोधक या बैठकीला येत नाहीत. आंदोलकांनी याकडं लक्ष द्यावं," असं शंभुराज देसाई म्हणाले.