छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Amit Shah News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील मराठा समाज भाजपावर राग व्यक्त करताना दिसून येतोय. त्याचाच प्रत्यय आज (4 मार्च) वैजापूर तालुक्यात पाहायला मिळाला. गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचं बॅनर मराठा आंदोलकांनी फाडून निषेध व्यक्त केला. त्यामुळं काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न दिल्यानं राज्यात भाजपा विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. हा त्याचाच एक प्रकार असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात आणखीन इतर काही कारण आहे का? याबाबत मात्र पोलीस तपास करत आहेत.
केंद्रीय मंत्र्यांची होणार सभा : उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. शहरातील सांस्कृतिक मंडळ येथे अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे. यानिमित्तानं संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली जात आहे. प्रत्येक रस्ता, चौक येथे सभेबाबत बॅनर आणि फलक लावण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात सभेचे बॅनर लावलेले होते. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून संतप्त मराठा बांधवांनी वैजापूर तालुक्यात लावण्यात आलेलं अमित शाह यांचं बॅनर फाडलं. वैजापूर तालुक्यातील टुणकी गावातील ही घटना असून त्याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.