महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

मनोज जरांगे पाटील आक्रमक; 24 फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा - Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : 'सगेसोयरे'बाबत मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्यातील सर्व सगेसोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडं केलीय.

Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 1:35 PM IST

Updated : Feb 21, 2024, 2:18 PM IST

जालना Manoj Jarange Patil : विशेष अधिवेशन घेत राज्य सरकारनं मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलंय. या आरक्षणानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. हे आरक्षण मिळालं हे चांगलंच आहे. मात्र, राज्यातील सर्व सगेसोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडं केलीय. तसंच त्यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावरही जोरदार टीका केलीय.

24 फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलन : ओबीसीतून आरक्षण द्यावं यासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत. येत्या 24 फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलन करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केलीय. प्रत्येक गावात रास्तारोको करा, कुठेही जाळपोळ, तोडफोड करू नका, सध्या परीक्षा सुरू असल्यानं विद्यार्थ्यांना त्रास होईल असं आंदोलन करू नका, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. आमच्या दारात नेत्यांनी येऊ नये, तसंच आमच्या शेतातूनही नेत्यांनी जायचं नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिलाय.

कुणबी प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे :मराठा आणि कुणबी हे सरसकट एकच करायला सरकारला अडचण काय आहे? असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी विचारलाय. सगेसोयरेची व्याख्या सरकारला दिली आहे. त्यामुळं सर्वांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा अध्यादेश सरकारनं काढावा, तसंच राज्यातील मराठा समाजावरील सर्व गुन्हे विनाअट मागे घ्यावेत, अशा विविध मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केल्या आहेत.

सरकारची डोकेदुखी वाढणार :राज्यातील शिंदे सरकारनं मराठा आरक्षण विधेयक मंगळवारी दोन्ही सभागृहात मंजूर केलंय. या विधेयकामुळं मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र, असं असलं तरी या विधेयकावर मनोज जरांगे पाटील यांनी आक्षेप घेतलाय. "आम्ही या १० टक्के आरक्षणाचे स्वागतच करतो. मात्र, आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. सरकारनं सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढलेली आहे. या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. अन्यथा एकदा का आंदोलनाची घोषणा झाली की, मग आम्ही माघार घेणार नाही," असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. मनोज जरांगे यांनी सलाईन काढून फेकलं, उपचारही केले बंद; नेमकं कारण काय?
  2. मराठा आरक्षणाचं विधेयक म्हणजे जनतेची फसवणूक, ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मत
  3. मराठा आरक्षणाच्या विधेयक मंजुरीनंतर सत्ताधारी नेत्यांमध्ये आनंद, विरोधकांना आरक्षण टिकण्याबाबत साशंकता
Last Updated : Feb 21, 2024, 2:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details