शेगांव (बुलडाणा) Manohar Joshi Passed Away : देशाच्या लोकसभेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या निधनामुळे शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरेंनी आजचा बुलडाणा दौरा रद्द केलाय. दोन दिवसाच्या बुलडाणा दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे आता बुलडाण्याहून मुंबईकडे निघाले आहेत. गुरुवारी त्यांनी चिखली, मोताळा, जळगाव जामोद याठिकाणी जनसंवाद सभा घेतली. यानंतर रात्री उद्धव ठाकरे शेगाव इथं मुक्कामी होते. आज सकाळी दहा वाजता संत गजानन महाराज यांच्या समाधीच्या दर्शनानंतर ते पुढील दौऱ्यासाठी निघणार होते. मात्र मनोहर जोशींच्या निधनामुळं सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.
दौरा थांबवून मुंबईकडे निघतोय : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनानं उद्धव ठाकरेंनी आजचे सर्वच कार्यक्रम रद्द केले असून ते मुंबईकडे निघाले आहेत. ''आज आम्ही जरी दौऱ्यावर असलो तरी दौरा थांबवून मुंबईकडे निघतोय. राज्यभरातून, देशभरातून डॉ. मनोहर जोशींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.'' अशी माहिती संजय राऊत यांनी दिलीय. "एक नगरसेवक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंतची मोठी पदं त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून भूषवली. शुन्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्त्व म्हणजो जोशी सर होते. ते आमचे आदर्श होते, कडवट शिवसैनिक होते. यशस्वी उद्योजकही होते, मराठी माणसांनी त्यांच्याकडून उद्योगशीलता शिकली पाहिजे," असे म्हणत राऊत यांनी जोशींच्या आठवणींना उजाळा दिला. तसंच बाळासाहेबांनी एक ब्राह्मण मुख्यमंत्री केला म्हणून त्यांच्यावर टीका केली. पण, बाळासाहेबांनी कधीही कोणाची जात पाहिली नाही, केवळ त्यांचं कर्तृत्व पाहिलं. बाळासाहेबांचा कडवट 'शिवसैनिक' म्हणून ते शेवटच्या श्वासापर्यंत जगले, असंही राऊतांनी म्हटलंय.