महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

महापालिकेत क्लार्कची नोकरी, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री; कसा होता मनोहर जोशींचा पाच दशकांचा राजकीय प्रवास? - नगरसेवक ते मुख्यमंत्री

Manohar Joshi Passed Away : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं पहाटे निधन झालंय. त्यांच्या निधनामुळं राजकीय वर्तुळात शोककळा पसरलीय. मुंबई महापालिकेत नगरसेवक ते मुख्यमंत्री आणि नंतर लोकसभा अध्यक्ष अशी अनेक पदं त्यांनी भुषवली आहेत.

Manohar Joshi Passed Away
Manohar Joshi Passed Away

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 7:49 AM IST

मुंबई Manohar Joshi Passed Away : राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष तसंच बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या मनोहर जोशी यांचं आज पहाटे निधन झालंय. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

5 दशकांचा राजकीय प्रवास संपला : तब्बल 5 दशकं राजकारणात सक्रिय असलेले मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांची राजकीय कारकीर्द मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून सुरु झाली. त्यानंतर ते महापौर, विधान परिषद सदस्य, आमदार, लोकसभा आणि राज्यसभा खासदार, केंद्रीय मंत्री झाले. तसंच नंतर अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात लोकसभेचे अध्यक्षही झाले होते.

महापालिकेत क्लार्कची नोकरी : मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रायगड जिल्ह्यातील नांदवी छोट्याशा गावात झाला. बालपणाचं शिक्षण गावाकडं झाल्यानंतर ते अकरावीला शिकण्यासाठी मुंबईला आले. त्यानंतर त्यांनी पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर मुंबई महानगरपलिकेत क्लार्कची नोकरी केली. त्यांनी वयाच्या 27 व्या वर्षी पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केलं. दरम्यान 1964 ला अनघा यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला.

बाळासाहेब ठाकरेंच्या प्रभावामुळं शिवसेनेत प्रवेश : त्याकाळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळं मनोहर जोशी यांनी 1967 साली शिवसेनेत प्रवेश करत राजकारणात सक्रीय झाले. पुढं मुंबई महानगरपालिकेत ते नगरसेवक झाले. त्यानंतर महापौर ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास पाहायला मिळाला. विशेष म्हणजे 1999 ते 2002 या काळात त्यांनी लोकसभेचं अध्यक्षपदही भुषवलं होतं.

शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान :महाराष्ट्रात 1995 मध्ये शिवसेना पहिल्यांदा सत्तेवर आली, तेव्हा त्यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं. शिवसेनेला सत्तेची कमान मिळाली होती आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदाचा मुकुट चढवला होता. अशा प्रकारे जोशींनी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला होता. 14 मार्च 1995 रोजी मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि 31 जानेवारी 1999 पर्यंत ते या पदावर राहिले. मनोहर जोशी यांनी 3 वर्षे 323 दिवस मुख्यमंत्री पदावर होते.

मराठी माणसाला लोकसभा अध्यक्ष होण्याचा मान : राज्याचं मुख्यमंत्री पद भुषवल्यानंतपर मनोहर जोशी यांनी 2002 ते 2004 दरम्यान तत्कालीन वाजपेयी सरकारच्या काळात लोकसभा अध्यक्ष पदही भुषवलं होतं. त्यांच्या रुपानं मराठी माणसाला लोकसभा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला होता. तसंच त्यांनी केंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्री म्हणूनही काम पाहिलंय. त्यानंतर ते राज्यसभेवरही गेले होते.

मनोहर जोशींचा राजकीय प्रवास :

  • 2 वेळा नगरसेवक
  • 3 वेळा विधानपरिषद सदस्य
  • मुंबई महानगरपालिका महापौर (1976 -77)
  • 2 वेळा विधानसभा सदस्य
  • विरोधी पक्षनेता - विधानसभा (1990- 91)
  • मुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य (1995-99)
  • केंद्रीय मंत्री (अवजड आणि सार्वजनिक उद्योग खाते)
  • लोकसभा अध्यक्ष (1999- 2002)
  • राज्यसभा खासदार (2002-2004)

डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून डी. लिट : मनोहर जोशी यांनी वयाच्या 72 व्या वर्षी 'शिवसेनेची निर्मिती, वाढ, स्वरुप, यशापयश आणि भारतीय राजकारणातील शिवसेनेचं भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास' या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली. त्यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून मानद डी. लिट. ही पदवीही मिळाली आहे.

संपूर्ण राजकीय आयुष्य एकाच पक्षात :शिवसेना वाढवण्यात मनोहर जोशी यांचा मोठा वाटा राहिलाय. त्यांनी आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य एकाच शिवसेना पक्षासाठी वाहून दिलं होतं. विशेष म्हणजे ठाकरे कुटुंबीयीच्या चार पिढ्यांसोबत त्यांनी काम केलंय. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत मनोहर जोशी यांनी काम केलंय. शिवसेनेत बंड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेटही घेतली होती.

हेही वाचा :

  1. राजकारणातील कोहिनूर हरपला; मनोहर जोशी यांचं दीर्घ आजारानं निधन

ABOUT THE AUTHOR

...view details