मुंबई Manohar Joshi Award : माजी मुख्यमंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचं वयाच्या 86 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. शिवसेनेतील एक अभ्यासू, मनमिळाऊ, मृदुभाषी अशी त्यांची ओळख होती. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांशी आणि नेत्यांशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. मनोहर जोशी यांच्या निधनानं राजकारणातील एक अभ्यासू नेता हरवल्याची खंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. तसंच 'लवकरच राज्य शासनातर्फे मनोहर जोशी यांच्या नावाने एक पुरस्कार सुरू करणार' असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे? : यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक मनोहर जोशी सरांचे निधन ही आमच्यासाठी दुखःद घटना आहे. खरंतर त्यांची तब्येत खालवल्याची बातमी कळली त्याचवेळी मी जोशी सरांना रूग्णालयात भेटायला जाणार होतो. मात्र, त्या आधीच ही दुखःद बातमी मिळाली. जोशी सरांचं बाळासाहेबांवर प्रचंड प्रेम आणि निष्ठा होती. एक अभ्यासू, संयमी आणि शिस्तीचा नेता अशी त्यांची ओळख होती. आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभलं, हे मी माझं भाग्य समजतो. बाळासाहेबांचा उजवा हात, अशी त्यांची ओळख होती."
'कोहिनूर' हिरा गमावला: पुढं ते म्हणाले की, "जोशी सर सामान्य घरात जन्माला आले. पण त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. त्यामुळं त्याचे कष्ट, मेहनत आम्ही जवळून पाहिलेत. बाळासाहेबांचा आणि त्यांच्या विचारांचा एक 'कोहिनूर' हिरा आम्ही गमावलाय. अशी मोठी माणसं फार कमी जन्माला येतात. त्यांचं नेतृत्व कौशल्य आम्ही पाहिलंय. संघटना कशी वाढवावी, माणसं कशी जोडून ठेवावी हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. त्यांची वक्तृत्व शैलीदेखील उत्कृष्ट होती. त्यामुळं भविष्यात जोशी सरांसारखे नेते तयार व्हावे, यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मनोहर जोशी सरांच्या नावानं एक पुरस्कार सुरू करण्याचा विचार आम्ही करत आहोत. येत्या काळात त्याची घोषणा केली जाईल. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना."