मुंबई Mahayuti Seat Sharing : पुढील आठवड्यात अठराव्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होणं अपेक्षित असून राज्यात अद्याप जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नाही. 'अबकी बार 400 पार' व राज्यात 45 पार अशी घोषणा भाजपानं केली असून राज्यात जास्तीत जास्त जागा या भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडून आणण्यासाठी भाजपानं पूर्ण रणनीती आखलीय. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला किती जागा द्यायच्या? व ते किती जागावर समाधानी होऊ शकतील याबाबत अद्यापही दिल्ली दरबारी खलबतं सुरु आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेला 9 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 4 जागा देण्याची तयारी भाजपानं दर्शवली असल्यानं शिंदे त्याचबरोबर अजित पवार गटाच्या पायाखालची वाळू सरकल्याचं पाहायला मिळतंय.
अमित शाहंच्या दौरानं संभ्रम वाढला : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं केंद्रीय गृहमंत्री, भाजपाचे जेष्ठ नेते अमित शहा दोन दिवस महाराष्ट्र तसंच मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी जागावाटपा संदर्भात विविध बैठका घेतल्या. अमित शाह यांच्या दौऱ्यात महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सोडवला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, भाजपानं एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजित पवार यांच्या गटाला देऊ केलेल्या जागा पाहता हा तिढा अद्याप कायम राहिलाय. भाजपानं राज्यात स्वतःच्या 35 उमेदवारांची यादी तयार केलीय. यामध्ये 10 ते 12 नवीन चेहऱ्यांचा समावेश असून काही दिग्गज नेत्यांना धक्के बसण्याची शक्यता आहे. भाजपाने पक्षातर्फे केलेल्या सर्वेक्षणात उमेदवाराची कामगिरी, जिंकून येण्याची क्षमता, जातीय संतुलन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा या सर्व बाबींचा अभ्यास करुन उमेदवार निवडले जाणार आहेत. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे व अजित पवार गटाला फारच कमी जागांवर निवडणूक लढवावी लागणार आहे. हा तोडगा या दोघांनाही अमान्य असल्यानं जागा वाढवून घेण्यासाठी एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजित पवार भाजप पक्षश्रेष्ठींकडे प्रचंड आग्रही आहेत.
शुक्रवारी दिल्लीत भेटीगाठी : एकनाथ शिंदे यांनी सध्या त्यांच्याकडे असलेल्या विद्यमान 13 खासदारांच्या जागांचा आग्रह धरलाय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं 22 जागा लढवल्या होत्या. त्यात 18 खासदार निवडून आले होते. त्यापैकी सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्याकडे 13 खासदार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं राज्यात लोकसभेच्या 16 जागांचा आढावा घेतलाय. यात दक्षिण मुंबई, नाशिक, दिंडोरी, भंडारा- गोंदिया, धाराशिव, हिंगोली, कोल्हापूर, बुलढाणा, सातारा, रायगड, माढा, बारामती, परभणी, शिरुर, अहमदनगर, गडचिरोली या जागांचा समावेश आहे. सध्याच्या घडीला अजित पवार यांच्याकडे रायगडची एकच जागा असून या जागेवर सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांकडून भाजपाकडं जास्तीत जास्त जागांची मागणी होतेय. याबाबत अजित पवार तसंच प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे शुक्रवारी दिल्ली दरबारी भाजपा पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
शिंदे, पवार गटाचे उमेदवार कमळ चिन्हावर लढणार का? : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत भाजपासोबत जात राज्यात सरकार स्थापन केलं. त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील व एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील अशी शक्यता असताना भाजपानं राज्यात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना विराजमान केलं. मोदींना 2024 साली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असणार आहे. हे सर्वांना माहित आहे. त्याच दरम्यान लोकसभा निवडणुकीची समीकरणं ही ठरली होती. पण ती उघड केली गेली नव्हती. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी शिंदे - फडणवीस सत्तेत एन्ट्री केल्यानंतर ही समीकरणं अजून बिघडली. परंतु, भाजपा त्यांच्या लक्ष्यावर ठाम असून या निवडणुकीत त्यांना कुठलाही धोका पत्करायचा नाही. अमित शाह यांच्यासोबत जागा वाटपा संदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीतील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर बुधवारी रात्री दिल्लीत भाजपा कोअर कमिटीच्या दोन बैठका झाल्या. या बैठकीत सुद्धा सकारात्मक तोडगा निघाला नसून आमच्या मित्र पक्षांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केलंय. योग्य तो सन्मान याचा अर्थ एकनाथ शिंदे व अजित पवार यांना हव्या असलेल्या जागा देणं की अपवादात्मक परिस्थितीत भाजपाच्या कमळ चिन्हावर त्यांचे उमेदवार उभं करणं असाही होऊ शकतो.
जागा वाटपावरुन महायुतीत वादाची ठिणगी : जागा वाटपावरुन भाजपानं अवलंबलेल्या धोरणाबाबत सध्या शिंदे गटाकडून नाराजगी व्यक्त केली जातेय. याबाबत शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी उघडपणे भाजपावर हल्लाबोल केलाय. केसानं आमचा गळा कापू नका, असा इशारा रामदास कदम यांनी भाजपाला दिलाय. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास ठेवून भाजपासोबत आलो आहोत. म्हणून आमचा विश्वासघात करुन केसानं गळा कापू नका. अशी समज त्यांनी महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांना द्यावी. इतकंच नव्हे तर मागच्या निवडणुकीची आठवण करुन देत मागच्या निवडणुकीत काय झालं? हे सर्वांना माहीत आहे. पुन्हा जर का आमचा विश्वासात झाला तर माझं नाव सुद्धा रामदास कदम आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या, असे खडेबोल सुद्धा रामदास कदम यांनी सुनावले आहेत. शिंदे गटाचे दुसरे नेते अर्जुन खोतकर यांनी सांगितलंय की, जागा वाटपाबाबत हा सर्वस्वी वरिष्ठ नेत्यांचा निर्णय असून याबाबत ते योग्य निर्णय घेतील. जागा वाटपा संदर्भात नको त्या लोकांनी नको ते वक्तव्य करु नये, कारण त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. परंतु 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या वाटेला जितक्या जागा होत्या, तितक्या जागा आम्हाला हव्या आहेत, असंही ते म्हणाले. महायुतीच्या जागावाटपा संदर्भात दररोज नवनवीन समीकरणं समोर येत असताना, शिंदे गट त्याचबरोबर अजित पवार गटांच्या नेत्यांची कोंडी झालीय. निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपानं आक्रमक पवित्रा घेतला असून एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजित पवार गटांची जागावाटपात मोठी गच्छंती होणार हे आता नक्की झालंय. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे, अजित पवार काय निर्णय घेतात, याकडं सर्वांचं लक्ष आहे.
हेही वाचा :
- ...तर वेगळं पाऊल उचलावं लागेल, कदमांचा भाजपाला इशारा
- माझी जात न बघता पक्षाने मला उमेदवारी दिली; हंसराज अहीर यांचं सूचक वक्तव्य कुणासाठी?