मुंबई State Cabinet Meeting: अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) आचारसंहितेची घोषणा कधीही होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा तिढा हा ना महाविकास आघाडीत सुटत आहे, ना महायुतीमध्ये. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा जागा वाटपाबाबत (Lok Sabha Seat Sharing) महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यासोबत जागावाटप लवकरच घोषित होईल. परंतु महायुतीत जो उमेदवार असेल त्यासाठी काम करावंच लागेल असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीच्या नेत्यांना दिलाय.
जागा वाटपाचा विषय छेडत नाराजी व्यक्त : देशात 'अबकी बार ४०० पार' आणि राज्यात ४५ पार अशी घोषणा भाजपानं दिल्यानं राज्यात भाजपा सर्वाधिक जागा लढवणार आहे, हे सर्वश्रुत आहे. परंतु अशा परिस्थितीत शिंदे गट त्याचबरोबर अजित पवार गटाला मोजक्यात जागा भाजपाकडून देण्यात येत आहेत. यावरून मंत्रिमंडळ बैठकीत काही नेत्यांनी हा विषय छेडत नाराजी व्यक्त केलीय. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा जागावाटप संदर्भात लवकरच अंतिम निर्णय घेणार आहेत. तुम्ही थोडा धीर धरा असा सल्ला मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना दिला. तर महायुतीकडून जो उमेदवार दिला जाईल त्या उमेदवारासाठी प्रत्येकाला काम करावंच लागेल, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व सहकाऱ्यांना दिलाय.