मुंबई :सध्या महाराष्ट्रात निवडणुकीमुळं वातावरण चागलंच तापलंय. 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालीय. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा २९ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असणार आहे. तर 30 ऑक्टोबर हा अर्जाची छाननी करण्याचा दिवस आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. त्यामुळं 29 तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. दरम्यान, गुरुवारी राज्यातील महायुती, महाविकास आघाडी आणि मनसेतील दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मुंबई, ठाणेसह राज्यभरात शक्तीप्रदर्शन करत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
शरद पवार, राज ठाकरेंची उपस्थिती : विशेष म्हणजे, कळवा-मुंब्रा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे जितेंद्र आव्हाड यांनी अर्ज दाखल करताना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती ही लक्षवेधी ठरली. तर ठाण्यातून मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. दुसरीकडं वरळीतून आदित्य ठाकरे यांचा अर्ज दाखल करतेवेळी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार सुनिल शिंदे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह आदित्य ठाकरे यांचे लहान बंधू तेजस ठाकरेही उपस्थित होते.
'या' दिग्गजांनी दाखल केले अर्ज : शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून दाखल केला. मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून मंगल प्रभात लोढा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. इंदापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. दुसरीकडं परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बहीण आमदार पंकजा मुंडे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या.
अर्ज दाखल केलेले उमेदवार : भाजपा महायुतीचे विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातील उमेदवार पराग अळवणी यांनी विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी ढोल-ताशाच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने भाजपा महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. तसेच भाजपाचे उमेदवार अतुल भातखळकर यांनी कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. भाजपाचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी मुलुंड विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. तर कालिदास कोळंबकर यांनी वडाळा विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. तसेच भाजपाचे अमित साटम यांनी अंधेरी पश्चिमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. राजन विचारे यांनी देखील अर्ज भरला. यावेळी ठाकरे गटाचे दोन्ही उमेदवार केदार दिघे आणि नरेश मनेरा हे उपस्थित होते.