मुंबई Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष विधानसभा निवडणुकीकडं लागलंय. महायुतीकडून सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली. सत्ता मिळाल्यावर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? याबाबतचा सस्पेन्स महायुती आणि महाविकास आघाडीत अजूनही कायम आहे. दोघांनीही अजून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला नाही. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नव्या की जुन्या चेहऱ्यांना संधी मिळणार, याबाबत आता चर्चा सुरू आहेत.
नवे चेहरे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात वेगवेगळी समीकरणं तयार झाली. महाविकास आघाडीच्या नावानं राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतली. अवघ्या अडीच वर्षांनंतर भाजपानं महाविकास आघाडीला सुरुंग लावत, शिवसेना फोडून राज्यात युतीचं सरकार स्थापन केलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यामुळं गेल्या पाच वर्षांत राज्यातील दोन प्रमुख पक्षांमध्ये झालेली फूट आणि राजकीय नेत्यांचा डावपेच यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात अराजकता निर्माण झाली. मात्र, या सर्व घडामोडीत आजी, माजी मुख्यमंत्री आणि महत्त्वाकांक्षी नवे चेहरे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं पाहायला मिळतंय.
...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान होतील, अशी विधानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वारंवार केली जात आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते संजू भोर पाटील म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटला आहे, त्यामुळं राज्यात महायुतीचं सरकार आल्यास एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील."
उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री : राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात 'चाणक्य' म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांच्या राजकीय खेळीतून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मुख्यमंत्रिपदी राहून त्यांनी कोरोना काळात काम केलं. त्यामुळं विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाऊ शकतात. तसंच उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील, असं ठाकरे गटाकडून सांगितलं जातंय.
"मी पुन्हा येईन..". म्हणणारे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री? : 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात युतीचं सरकार स्थापन झालं. राज्य विधिमंडळाच्या शेवटच्या अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मी पुन्हा येईन..." असं विधान केलं होतं. मात्र ,2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानं त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं. मात्र, दोन वर्षांपूर्वी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं, मात्र मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीनं त्यांना हुलकावणी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वाधिक जागा जिंकणार असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशा भावना भाजपाच्या गोटातून व्यक्त केल्या जात आहेत.