छत्रपती संभाजीनगर : 5 डिसेंबर रोजी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. नवीन सरकार स्थापनेचा हा मुहूर्त काढण्यात आलाय. मात्र, नेमका हाच दिवस आणि हीच वेळ ठेवण्याचं धार्मिक कारण देखील आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि सायंकाळी 5 वाजेपासून पुढे दीड तासात सोहळा झाल्यास मित्र पक्षांशी वाद विवाद न होता स्थिर सरकार मिळेल असा विश्वास असल्यानं, हा दिवस निवडण्यात आल्याची माहिती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितली.
'या' मुहूर्तावर होणार शपथविधी : मोठ्या प्रतीक्षेनंतर नवीन सरकार स्थापनेचा मुहूर्त अखेर ठरला. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी साधारणतः साडेपाच पर्यंत हा सोहळा होईल. 23 नोहेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर मिळालेलं बहुमत पाहता लगेच शपथविधी सोहळा पार पडेल असं वाटत असताना, भाजपा आणि मित्रपक्षांचे मंत्रिमंडळातील आकडेमोड रखडल्यानं तब्बत 12 दिवसांनी अखेर सोहळा संपन्न होईल. मात्र 5 डिसेंबर ही दिनांक पाच दिवसाआधी ठरली. नेमका हाच दिवस का निवडला? असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र हा दिवस आणि वेळ निवडण्यामागे धार्मिक बाब असल्याचं ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितलं.