संगमनेर (अहिल्यानगर) :महाराष्ट्रातील संगमनेर विधानसभा जागेसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झालं होतं. यावेळी महायुतीकडून संगमनेर विधानसभेसाठी अमोल धोंडीबा खताळ यांना उमेदवारी दिली होती. तर महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी दिली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालात संगमनेरची जागा काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी जिंकली होती. आता काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, बाळासाहेब थोरात हे पराभूत झाले आहेत.
मुख्यमंत्रिपदाचे होते दावेदार :बाळासाहेब थोरात हे काँग्रेसच्या पहिल्या फळीतले नेते आहेत. संगमनेर हे नाव घेतलं की आपोआप थोरात यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. मागील अनेक वर्षांपासून थोरात हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आले आहेत. आताही ते महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून चर्चेत होते.
विखे पाटलांनी लावली होती ताकद : अमोल खताळ यांच्यासाठी राधाकृष्ण विखे पाटलांनी मोठी ताकद लावली होती. राधाकृष्ण विखे पाटलांच्या नियोजनबद्ध प्रचारयंत्रणेमुळं बाळासाहेब थोरातांना पराभवाचा सामना करावा लागला, अशी चर्चा आहे. निवडणूक हलक्यात घेणं थोरातांना महागात पडलं. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता.
संगमनेर आणि वाद : विधानसभा प्रचारादरम्यान विखे विरुद्ध थोरात असा सामना रंगला होता. बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आणि सुजय विखे पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं होतं. भाजपाच्या एका नेत्यानं थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक देखील झाले होते. संगमनेरमध्ये भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आले होते. काही गाड्यांवर दगडफेकही झाली होती. त्यामुळं या विधानसभा मतदारसंघाकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.
हेही वाचा -
- महायुतीच्या महाविजयानंतर राज्यात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष
- 'लाडकी बहीण योजना' महायुतीसाठी कशी ठरली गेम चेंजर? महाविकास आघाडीला बसला मोठा धक्का
- विधानसभा निवडणुकीत कोण विजयी? पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी